संकेत भोसले हत्याकांड; 50 लाखांची नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी
ठाणे: अकरावीत शिकणाऱ्या भिवंडीतील संकेत भोसले या मुलाची जातीयवाद्यांनी हत्या केली आहे. या प्रकरणातील मारेकऱ्यांना अटक झाली असली तरी आजवरचा इतिहास पाहता दलित अत्याचार प्रकरणात न्याय मिळालेला नाही. अशी खंत पीपल्स रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त करत, याप्रकरणी ॲट्रॉसिटी गुन्ह्यांसाठी फास्टट्रॅक कोर्ट गठीत करावेत; आणि मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, तसेच संकेत भोसलेच्या कुटुंबियांस पन्नास लाखांची भरपाई द्यावी, अशी मागणी ही त्यांनी केली आहे.
भिवंडी येथील संकेत भोसले या दलित तरुणाची नुकतीच निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शुक्रवारी प्रा. कवाडे आले होते. त्यानंतर ते ठाणे येथील शासकीय विश्रामगृह येथे आले होते. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील मागणी केली आहे. पुढे बोलताना, कवाडे यांनी राज्यातील गटई कामगारांच्या अनेक समस्या आहेत. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्ष आग्रही आहे. शासन आपल्या दारीहा उपक्रम राबवणार्या सरकारच्या दारात आता चर्मकार आला आहे. त्याची झोळी सरकारने रिकामी ठेवू नये, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळेस जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले, जिल्हा महासचिव शंकर जमदाडे, हनुमंत जगताप, मिना अलींग, सुचित्रा स्वामी, जया साधवानी, शहराध्यक्ष विकास गायकवाड,, शांता जाधव, शबनम शेख, दैवशाला शिंदे, आदी उपस्थित होते.






