Homeठाणे-मेट्रोकासारवडवलीत पत्र्याच्या झोपडीला आग ; एका मिनी गॅस सिलिंडरचा स्फोट

कासारवडवलीत पत्र्याच्या झोपडीला आग ; एका मिनी गॅस सिलिंडरचा स्फोट

आठ झोपड्यांचे नुकसान ; घरगुती साहित्य जळून खाक

ठाणे: नव्या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या पत्र्याच्या झोपडीला आग लागून ०१ मिनी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला . ही घटना गुरुवारी दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील सेवेन स्क्वेअर स्कूल जवळ घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसून आगीत ८ झोपड्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये झोपडपट्टी मधील घरगुती वापराचे साहित्य,भांडी, कपडे इत्यादी साहित्य जळून खाक झाले आहे. शिवाय या आगीवर जवळपास पाऊण तासांनी नियंत्रण मिळविण्यात स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
कासारवडवली येथे मे. बामजी श्यामजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची साईट सुरू आहे. तेथे काम करणाऱ्या कामगारांसाठी पत्र्याच्या झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. त्यापैकी एका झोपडीला गुरुवारी अचानक आग लागली. तसेच याचवेळी तेथील एका मिनी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. याची माहिती मिळताच घटनास्थळी ठामपा आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्याला स्थानिक नागरिकांची साथ मिळाल्याने ती आग अवघ्या पाऊण तासात नियंत्रणात आली. या आगीची झळ ही आजूबाजूच्या सात झोपड्यांना बसली. या घटनेत एकूण ८ झोपड्यांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून तेथून अग्निशमन दलाच्या जवानांनी २ मिनी गॅस सिलिंडर व १ एचपी भारत गॅस सिलिंडर जमा करून घेतले आहेत. तर यावेळी ०१ फायर आणि ०१ रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!