ठाणे :- लेकीकडे राहण्यासाठी गेलेल्या वयोवृद्ध मराठे या दाम्पत्याच्या बंद घराचा कडीकोयंडा उचकटुन भरदिवसा घरातील सोने-चांदीचे दागिने असा ८ लाखांचा ऐवज लांबविणाऱ्या दिव्यातील गणेश दिलीप गुप्ता उर्फ गणेश प्रकाश आव्हाड (२०) या अट्टल चोरट्यास नौपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करत अटक केली. तर चौकशीत त्याने नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहा घरफोडींच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याच्याकडून १० लाख ९९ हजार किंमतीचे सोने व चांदीचे दागिने हस्तगत करण्यात यश आले आहे. तर या गुन्ह्यातील मुख्यसूत्र असलेली त्याची आई पूजा (४५) ही पसार असून सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे मायलेक दिसून आले आहेत. तसेच चोरीचे दागिने विकून परजिल्ह्यात पसार होण्याचा त्यांचा मनसुबा होता,अशी माहिती पोलिसांनी दिली.
नौपाडा, ब्रम्हांड सोसायटी परिसरात राहणारे शरदचंद्र मराठे यांच्या घरी १३ जुलै २०२५ रोजी चोरी झाल्याप्रकरणी अतुल शरदचंद्र मराठे यांनी तक्रार दिली होती. त्यामध्ये त्यांच्या घराचा कडीकोयंडा भरदिवसा उचकटुन सोने व चांदीचे दागिने दागिने असा ०७ लाख ९९ हजार किंमतीचे दागिने चोरीला गेल्याचे म्हटले होते. याप्रकरणी वरीष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय दवणे यांनी दिलेल्या सुचनानुसार आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी असलेल्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करता, एक महिला व तिच्यासोबत दोन मुले दिसून आले. एका लहान मुलीच्या पाठीवरील बॅगमध्ये घरफोडीकरीता लागणारे सामान काढताना स्पष्ट दिसत होते. त्यानंतर ठाणे शहरातील तसेच इतर ठिकाणावरील सुमारे १०० हुन अधिक सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासले असता, ती महिला सराईत गुन्हेगार असल्याचे दिसुन निषन्न झाले. ती घटनास्थळाकडे येताना ठाणे स्टेशन परिसर तसेच तलावपाळी परिसरात फिरत फिरत आली असल्याचे सीसीटीव्ही दिसून आले. याशिवाय घरफोडी करून ती महिला ही पोलीसांना गुंगारा देण्यासाठी घटनास्थळावरील प्रत्येक रस्ता हा ३००-४०० मीटर पुढे जावुन १५-२० मिनिट थांबुन पुन्हा रस्ता बदलत होती. तेथील परिसरातील इतर सीसीटिव्ही कॅमे-याची सतत पाहणी केली असता त्या घटनेतील महिला आणि त्याच्यासोबत असलेल्या साथीदारांचा चेहरा स्पष्ट दिसुन आले. त्यानंतर त्यांचा फोटो काढून ठाणे शहरातील सिध्देश्वर तलाव, खोपट, तलावपाळी, चंदनवाडी ठाणे रेल्वे स्टेशन परिसर तसेच वागळे इस्टेट, वर्तकनगर, राबोडी, कळवा, मुंब्रा पोलीस ठाण्याचे हद्दीत तपास केला. दरम्यान घरफोडी करणारी महिला व तिचे साथीदार दिवा परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार नौपाडा पोलिसांनी दिवा गाव, साबेगाव, खर्डी गाव, दातीवली इ. ठिकाणी सलग दोन व दोन रात्र रेकी करून शोध घेतला असता. यावेळी आरोपी हा दिवा गावातील डम्पिंग ग्राउंडमध्ये दाट लोकवस्ती ठिकाणी राहतो, म्हणून त्या ठिकाणी गेले असता आरोपी हा पोलीसांना पाहुन तेथुन पळून जाण्याचा प्रयत्नात असताना त्याचा पाठलाग करुन सहायक पोलिस निरीक्षक भांगे व त्यांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई १७ जुलै रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
तर न्यायालयाने त्याला येत्या २५ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून १०० ग्रॅम सोन्याचे दागिने. २.५ किलो ग्रॅम चांदीची भांडी व दागिने व ४० हजार रुपये रोख रक्कम, घराफोडीचे हत्यारे असा मुददेमाल हस्तगत करण्यात यश आले आहे. तसेच त्याने दहा गुन्ह्यांचीही कबुली दिली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली