ठाणे: जागेच्या वादातून जीवघेणा हल्ल्यात मलिक सिकंदर सुरमे यांचा मृत्यू झाला होता. त्या हत्येप्रकरणी आरोपी शाहिद गुलाम मुस्तफा सुरमे (४५) याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश वसुधा भोसले यांनी बुधवारी २५ सप्टेंबर रोजी दोषी ठरवून त्याला आजीवन सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ही घटना ३ डिसेंबर २०१० रोजी मुंब्र्यात घडली होती. तर, या खटल्यात सरकारी वकील म्हणून वर्षा चंदने काम पाहिले.
मुंब्रा-कौसा जामा मस्जिद ट्रस्टी अब्दुल गणी अब्दुल मजिद डोंगरे व मलीक सिकंदर सुरमे, लियाकत ढोले यांच्या ट्रस्टीच्या जागेवरून असलेल्या वादातुन अब्दुल गणी अब्दुल मजिद डोंगरे व शाहिद गुलाम मुस्तफा सुरमे यांनी कट रचुन मलीक सिकंदर सुरमे व लियाकत ढोले यांच्यावर जिवघेणा हल्ला केला व त्यात मलीक सिकंदर सुरमे यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात भादवि 302,307,120 (ब) सह आर्म अॅक्ट 4,25 सह मुंबई पोलीस कायदा 37 (१), 135 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. त्या गुन्हयाचा प्राथमिक तपास स्थानिक पोलीस आणि त्यानंतर गुन्हे शाखा, घटक-1 यांनी करून भक्कम पुरावे गोळा केले. तसेच याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. हा खटला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश वसुधा भोसले यांच्या न्यायालयात आल्यावर सुनावणीदरम्यान सरकारी वकील वर्षा चंदने यांनी सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून आरोपी शाहिद गुलाम मुस्तफा सुरमे याला न्यायालयाने दोषी ठरवले. तसेच त्याला आजीवन सश्रम कारावास व १३ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सादिक यांनी केला.
….






