ठाणे: जुनी पेन्शन लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महामंडळे, नगरपालिका, महानगरपालिका आदींचे कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हा परिषदेपासून ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढून आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागातील शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते.
राज्य शासनाने नोव्हेंबर २००५ पासून या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद केली आहे. ती पुन्हा लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली बुधवारी राज्यस्तरीय आंदोलन छेडण्यात आले. त्यानुसार बुधवारी जिल्ह्यातील सर्व कर्मचारी एकत्र येऊन बाईक रॅली काढण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील व शहरातील कर्मचारी, अधिकारी येथील जिल्हा परिषदेच्या चौकात एकत्र जमले होते. दुपारी १२ वाजता या रॅलीला सुरुवात झाली हि रॅली मुख्य बाजारपेठेतून सरळ कोर्ट नाक्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येवून थांबली. यावेळी या रॅलीचे सभेत रूपांतर झाले. त्यानंतर या आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांनी जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीचे निवेदन दिले. कर्मचाऱ्यांच्या मागणीचा तातडीने विचार करून त्यावर योग्यती कार्यवाही करावी, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे यांनी दिली आहे.






