दिवा :- मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी दिवा शहरात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत प्रचंड जल्लोष केला. युतीच्या घोषणेचे वृत्त समजताच दिवा शहरातील शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले.
यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली आणि एकमेकांना पेढे भरवून आपला आनंद व्यक्त केला. ‘जय महाराष्ट्र ‘च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील, शिवसेना (UBT) शहर प्रमुख सचिन पाटील, विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे, शहर संघटिका ज्योती पाटील, मनसे सचिव प्रशांत गावडे यांच्यासह दोन्ही पक्षांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, या जल्लोषामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग नोंदवला. दोन्ही पक्षांची ताकद आता एकत्र आल्यामुळे दिव्यातील राजकीय समीकरणे बदलणार असून, आगामी काळात ही युती विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरेल, असा विश्वास स्थानिक नेत्यांनी यावेळी व्यक्त केला.






