शिवसेना शिंदे गटाने दिव्यात प्रचाराचा नारळ फोडला
दिवा: आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. शिवसेना (शिंदे गट) दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांनी प्रचाराचा नारळ फोडत कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला आहे. “ज्या विश्वासाने गेल्या आठ वर्षांत दिव्यात विकासकामे केली, त्याच जोरावर आगामी निवडणुकीत शिवसेनेचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रचाराचा शुभारंभ आणि शक्तीप्रदर्शन
गणेश नगर येथील श्री गणेश मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आणि साकडे घालून प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना आणि युवती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उत्साह पाहून मढवी यांनी सर्वांचे आभार मानले.
विकासाचा लेखाजोखा: २०१७ पासून ठाणे महानगरपालिकेत दिव्यातील जनतेने शिवसेनेवर विश्वास टाकला. गेल्या ८ वर्षांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून दिव्याचा कायापालट झाला आहे, असे मढवी यांनी नमूद केले.
‘मिशन ११’ चा संकल्प: प्रभाग क्रमांक 28 चे ४ नगरसेवकच नव्हे, तर शेजारच्या प्रभागांतील ४ आणि इतर ३ असे एकूण ११ उमेदवार निवडून आणून एकनाथ शिंदे यांच्या हाती महापालिकेची एकहाती सत्ता सोपवण्याचा निर्धार मढवी यांनी व्यक्त केला.
‘धनुष्यबाण’ घराघरात पोहोचवा: “उमेदवार कोण हे न पाहता ‘धनुष्यबाण’ हीच आपली निशाणी आणि एकनाथ शिंदे हेच आपले नेतृत्व आहे, हे विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
लोकसभा-विधानसभेची पुनरावृत्ती: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दिव्यातून शिवसेनेला जसे ऐतिहासिक मताधिक्य मिळाले, तसाच निकाल १५ जानेवारीला होणाऱ्या निवडणुकीत लागेल, अशी खात्री त्यांनी वर्तवली.
कार्यकर्त्यांना साद
भाषणाच्या शेवटी मढवी यांनी कार्यकर्त्यांना ‘घरोघरी जाऊन संवाद साधण्याचे’ आणि गेल्या पाच वर्षांतील कामांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले. या कार्यक्रमामुळे दिव्यात शिवसेनेने निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.






