Homeठाणे-मेट्रोठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सरकार कटिबध्द-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सरकार कटिबध्द-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


ठाणे : ठाणेकरांना अंतर्गत वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यात, बायपास, ईस्टर्न फ्री वेचा विस्तार यांचा समावेश आहे. एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिका त्यासाठी काम करते आहे. त्यामुळे सगळे रस्ते वाहतूक कोंडी मुक्त होतीलच, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केला.
          कळवा खाडीवरील तिसऱ्या पुलाच्या एका मार्गिकेचे रविवारी सायंकाळी मुख्यमंतत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे, माजी उपमहापौर पल्लवी कदम, गोपाळ लांडगे, सुधीर कोकाटे, ठामपा आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, शहर अभियंता प्रशांत सोनग्रा आदी उपस्थित होते.
         आयुक्त अभिजित बांगर यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि तिसऱ्या कळवा खाडी पुलाबद्दल सादरीकरण केले. तसेच, उर्वरित कामांच्या प्रगतीची माहिती दिली.
         तिसऱ्या खाडी पुलाचे लोकार्पण झाल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले. तसेच, पुढील मार्गिका एक डिसेंबर रोजी सुरू करण्याची घोषणाही केली. तसेच, या पुलाचा विस्तार पटनीपर्यंत करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही स्पष्ट केले. तीन हात नाका, माजीवडा जंक्शन येथेही लवकरच काम सुरू होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.
       लोकार्पण सोहळ्यानंतर सर्व मान्यवरांनी तिसऱ्या कळवा खाडी पुलावरून प्रवास केला आणि ही मार्गिका तत्काळ लोकांसाठी खुली करण्यात आली. ठाणे कारागृहाजवळील मार्गिका डिसेंबर महिन्यामध्ये वाहतूकीस खुली करण्यात तयार होईल.उर्वरित साकेत कडील मार्गिका मार्च २०२३ पर्यंत वाहतूकीस पूर्ण तयार होऊन संपूर्ण पूल वाहतूकीस उपलब्ध होईल.
संपूर्ण पूल मार्च २०२३ मध्ये वाहतूकीस उपलब्ध झाल्यानंतर कळवा, मुंब्रा आणि बेलापूर कडे जाणारी संपूर्ण वाहतूक पूलावरुन एकेरी मार्गाने जाईल आणि बेलापूर रोड कळवा, मुंब्रा कडून ठाणे शहराकडे येणारी वाहतूक पूर्णपणे सध्या वापरात असलेल्या पूलावरुन एकेरी मार्गाने धावताना दिसेल.तर, पूल पूर्ण क्षमतेने  मार्च २०२३ मध्ये वाहतूकीस उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडीची संपूर्ण समस्या दूर होणार आहे.

error: Content is protected !!