दिवा:- एकेकाळी दिवा शहराची शान असलेला, मात्र गेल्या 17-18 वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत असलेला दिवा स्टेशन परिसरातील तलाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिवा शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी दिवा भाजप शिष्टमंडळाने स्थानिक महायुतीचे आमदार श्री. राजेश मोरे यांची भेट घेऊन तलावाच्या तात्काळ सुशोभीकरणासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली.
तलावाची सद्यस्थिती आणि समस्या
एका काळी घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन आणि इतर धार्मिक विधींसाठी वापरला जाणारा हा तलाव आज अक्षरशः मृत्यू अवस्थेत आहे.स्टेशन परिसरात बसणारे मच्छी विक्रेते आणि भाजीपाला विक्रेते तलावात घाण पाणी आणि कचरा टाकतात, ज्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. स्टेशनवरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो.
भाजप शिष्टमंडळाची मागणी
या सर्व समस्या घेऊन दिवा भाजप शिष्टमंडळाने आमदार श्री. राजेश मोरे यांची भेट घेतली. तलावाचे तातडीने सुशोभीकरण करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. लवकरच येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्याची मागणीही दिवा भाजपने यावेळी केली.
आमदारांकडून सकारात्मक आश्वासन
आमदार श्री. राजेश मोरे यांनी भाजप शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा केली आणि लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपस्थित मान्यवर
यावेळी भारतीय जनता पार्टी दिवा मंडळ अध्यक्ष श्री. सचिन भोईर, ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य श्री. अशोक बाबुराव पाटील, श्री गणेश पद्माकर भगत, श्री. रोशन भगत, माजी मंडळ अध्यक्ष श्री. दिलीप भोईर, दिवा मंडळ सरचिटणीस श्री. समीर नारायण चव्हाण, श्री. अंकुश मढवी, व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्रीधर पाटील, उ.भा.मोर्चा अध्यक्ष अजय सिंग, अशोक गुप्ता आदी पदाधिकारी उपस्थित होते.