
दिवा भाजपच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन
दिवा:-वाढत्या दिवा शहरात अपुरे पोलीस संख्याबळ असून असणाऱ्या पोलीस चौकीमध्ये महिला पोलीस अधिकारी – कर्मचारी नसल्याने अनेक वेळा महिलांच्या तक्रारी दाखल करताना अडचणी निर्माण होतात व महिला तक्रारदारांना त्यांच्या तक्रारी मोकळेपणाने दाखल करता येत नाहीत असे सांगत दिवा भाजपच्या महिला मंडळ अध्यक्ष सपना रोशन भगत यांनी दिवा पोलीस चौकीत महिला पोलीस अधिकारी कर्मचारी देण्याची मागणी केली आहे.
याबाबत भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठाणे पोलीस आयुक्त अशितोष डुंबरे यांना निवेदन देण्यात आले असून यावेळी भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुळे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा स्नेहा पाटील, दिवा मंडळ महिला अध्यक्ष सौ सपना भगत यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सपना भगत यांनी म्हटले आहे की दिवा शहरात पाच ते सहा लाख लोक वस्ती आहे.महिलांवर होणारे अत्याचार,त्यांची होणारी छेडछाड, विनयभंग अशा अनेक घटना दिवसेंदिवस घडत आहेत. या सर्व कारणांमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी दिवा शहरात ग्लोबल शाळेजवळ असणाऱ्या पोलीस चौकीत महिला पोलीस नसल्याने अनेक वेळा महिला वर्गातून कोणतीही खाजगी तक्रार दाखल करताना अडचणी निर्माण होतात.महिलांना सहज पध्दतीने विना अडचण तक्रार दाखल करण्यासाठी दिवा पोलीस चौकीत महिला पोलीस अधिकारी नियुक्त करण्यात यावी अशी मागणी दिवा भाजपच्या वतीने सपना भगत यांनी या पत्राद्वारे केली आहे.
