दिवा :- दिवा शहरातील बी.आर. नगर येथील टाटा पॉवर रोड, जो दातिवली मार्ग शिळफाट्याला जोडतो आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वाचा पर्यायी मार्ग म्हणून वापरला जातो, त्याची सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यातच ठाणे महानगरपालिकेने गटारातील कचरा रस्त्यावर काढल्याने हा रस्ता पूर्णपणे गटारमय झाला आहे. यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या कामगार वर्गासह स्थानिक रहिवाशांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या रस्त्याच्या तात्काळ दुरुस्तीची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दिवा शहरातील बी.आर. नगर येथील शाखाप्रमुख विलास उतेकर यांनी केली आहे. त्यांनी पालिका प्रशासनाकडे लवकरात लवकर रस्त्यावर खडी टाकून तो सुस्थितीत आणण्याची मागणी केली आहे.
यावेळी दिवा शहरप्रमुख श्री. सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सौ. प्रियंका नितीन सावंत (दिवा शहर समन्वय विभागप्रमुख), श्री. सचिन पारकर (शाखा संघटक) आणि सौ. सुजाता मोरे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, पालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन मार्ग पूर्ववत करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.