महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी दिवा न्यूजचे संपादक सुहास खंडागळे यांना विशेष मुलाखत दिली.यावेळी त्यांनी दिवा शहरातील मूलभूत प्रश्नांवर रोखठोक भाष्य करत सत्ताधाऱ्यावर दिशांना साधला… दिवा शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी यावेळी परिवर्तन आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले…
प्रश्न:-दिव्यात अधिकृत आणि अनधिकृत शाळा असा वाद सुरू आहे.या वादात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते.. याबाबत काय सांगाल?
तुषार पाटील:-खरंतर अनधिकृत आणि अधिकृत शाळा असा वाद शिक्षणाच्या बाबतीत होणं दुर्दैवी आहे. अनधिकृत शाळा बंद होऊन त्यांचे विद्यार्थी अधिकृत शाळांना मिळावेत ही अधिकृत शाळांची भूमिका स्वार्थी आणि विद्यार्थी हिताच्या आड येणारी आहे.ज्या शाळांना परवानगी नाही त्यावर एकतर महापालिकेने कारवाई करावी किंवा त्यांना परवानगी देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अनधिकृत शाळांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हे विद्यार्थ्यांचे भविष्य खराब करण्यासारख आहे. मुळात महापालिकेने इतक्या वर्षात स्वतःचे शैक्षणिक धोरण दिव्यात सक्षमपणे राबवलं नाही. ही वस्तुस्थिती जी अलीकडे समोर आली आहे, ती भयानक आहे. महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या लोकांनी दिव्यात शैक्षणिक सोयी सुविधा पुरवल्या नाहीत आणि यातूनच दिव्यात शिक्षणाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. लोकसंख्या वाढल्याने वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात येथे शिक्षण सुविधा नाहीत ही वस्तुस्थिती आहे. महापालिका प्रशासनाने धोरणात्मक दृष्टिकोनातून याकडे पाहिले पाहिजे आणि दिवा शहरात जी महापालिका शाळा वाढवण्याची मागणी होऊ लागली आहे त्या दृष्टीने ठोस उपाययोजना करायला हव्यात. ज्यांनी दिव्यात शैक्षणिक असुविधा निर्माण केल्या तेच मेळावे आणि आंदोलने करणार असतील तर सत्तेत राहून तुम्ही इतके दिवस काय केलं? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो.
प्रश्न:-दिवा शहरातील फेरीवाल्यांविरोधात सर्वजण आवाज उठवतात… तरीही फेरीवाले हटवले जात नाहीत…
तुषार पाटील:-महापालिकेचा जर आशीर्वाद फेरीवाल्यांना असेल तर फेरीवाले कसे हटवले जातील?दिव्यातील रस्ते मोकळे व्हावेत ही मुळात पालिका प्रशासनाची इच्छा नाही. महापालिका प्रशासनाला वारंवार मनसेच्या माध्यमातून आम्ही सांगूनही दिवा शहरातील रस्ते मोकळे करण्यात महापालिका प्रशासन, सहाय्यक आयुक्त अपयशी ठरत आहेत. यांना दिवा शहराच्या नियोजनाशी काही देणंघेणं नाही. दिवा शहराचा या लोकांनी बाजार मांडलेला आहे.मनसेमुळे स्टेशन परिसरातील फेरीवाले काही काळ हटवले गेले, मात्र या लोकांना आर्थिक हितसंबंधातून रस्त्याच्या दुतर्फा बसवले जाते आणि सर्वसामान्य दिवेकरांना मात्र याचा त्रास होतो.वाहतूक कोंडी होते. चालण्यासाठी रस्ते नाहीत. किमान महत्त्वाचे रस्ते तरी मोकळे सोडायला हवेत. मात्र महापालिकेचे अधिकारी आणि फेरीवाल्यांकडून चिरीमिरी घेणारे यांच्या स्वार्थी भूमिकेमुळे दिवावासियांचे नुकसान होत आहे.
प्रश्न:-दिवा म्हटलं आरोग्य समस्या आलीच…आरोग्याचा विषय न सुटण्याचे कारण काय?
तुषार पाटील:-हे तुम्ही पालिका आयुक्तांना विचारायला हवे. दिव्यातील नागरिकांसाठी एक रुग्णालय महापालिका देऊ शकत नसेल तर अशी महापालिका दिव्याला हवी कशाला?आरोग्य समस्या आहे, पाणी समस्या आहे हे प्रश्न इतक्या वर्षात सुटले नाहीत. याला इच्छाशक्तीचा अभाव हे कारण आहे.तुम्ही ज्या लोकांना आरोग्य, शिक्षण, रोजगार यातल्या गोष्टी कळतच नसतील, असे लोकं निवडून देत असाल तर दिव्यातील प्रश्न सुटणार कसे? आरोग्याच्या प्रश्नावर सांगायचं झालं… तर दिव्यात एक साधारण हॉस्पिटल नाही. साधे क्लिनिक उघडून महापालिका दिव्यातील आरोग्य सुविधा देत असल्याचा जो आव आणत आहे, तो चुकीचा आहे. तुम्ही ओपीडी चालू केले आहेत. परंतु येथील रुग्णांना ओपीडीची नाही तर हॉस्पिटलची गरज आहे. तुम्ही दिवा शहरासाठी हॉस्पिटल कधी सुरू करणार आहात? हा प्रश्न आहे. दिव्यात तुम्ही एखादी भाड्याची जागा घेऊन सुद्धा हॉस्पिटल सुरू करू शकता. परंतु हॉस्पिटल सुरू करायचं नाही आणि फक्त ओपीडी सुरू करायच्या यातून तुम्ही दिव्यातील जनतेच्या आरोग्याबाबत किती गंभीर आहात हे कळते.
प्रश्न:-दिव्यातील नागरिकांसाठी वाहतूक समस्येच्या दृष्टीने काय उपाययोजना असायला हव्यात?
तुषार पाटील:-वाहतूक कोंडी हा येणाऱ्या काळात दिव्यात गंभीर प्रश्न म्हणून निर्माण होणार आहे.याकडे पाहायचं झालं तर यावर आताच उपाय योजना होणे गरजेचे आहे.त्यासाठी दिवा शहरातील रस्ते पहिल्यांदा मोकळे करायला हवेत. फेरीवाल्यांना अन्य ठिकाणी जागा द्यायला हवी.रस्ते लहान आहेत.दिवा शहरात अंतर्गत सार्वजनिक प्रवासाच्या दृष्टीने मिनी बस महापालिकेने सुरू करायला हव्यात. मोठ्या बस दिवा शहरात आत मध्ये फिरू लागल्यास ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होईल.गर्दीच्या वेळी अवजड वाहनांना शहरात बंदी हवी. बस स्थानक हे दिवा शहराच्या बाहेरच असायला हवं.मीनी बस सुरू झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा दिवा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना होईल. महापालिकेने त्या दृष्टीने विचार करायला हवा.
प्रश्न:-दिवा लोकल सुरू होण्याची मागणी होत आहे…
तुषार पाटील:- सत्ताधाऱ्यांनीच ती मागणी करून काय फायदा ? जे सत्तेत आहेत ते मागील दहा वर्षापासून फक्त मागणीच करत आहेत.मुळात त्यांनी निर्णय घ्यायला हवा.दिवा लोकल सुरू करायला हवी. जे लोक सत्तेमध्ये बसले आहेत,त्यांनी घाटकोपर प्रमाणे दिव्यातून लोकल सुरू करण्यासाठी आग्रह करायला हवा. किती दिवस तुम्ही जनतेला आश्वासन देणार आहात… तुम्हीच सत्तेत राहणार… तुम्हीच मागण्या करणार आणि तुमच्याच मागण्या पूर्ण होणार नसतील तर तुम्ही सत्तेत राहता कशाला?जनतेने सुद्धा या गोष्टी आता लक्षात घ्यायला हव्यात. दिव्यात मागील दहा वर्षात किती अपघात झाले आहेत.लोकांची मागणी असतानासुद्धा दिवा लोकल सुरू होत नसेल तर याला जबाबदार सत्ताधारी आहेत.
प्रश्न:-आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून दिवावासीयांना काय आवाहन कराल?
तुषार पाटील:-कोणत्याही आमिषाला बळी न पडता यावेळी मतदान करा.प्रत्येक वेळेला मतदान करता आणि तुमचे प्रश्न तसेच राहतात. प्रश्न न सोडवणारे लोक जर तुम्ही निवडून दिलेत तर ते तुम्हाला गृहीतच धरणार. मुळात दिव्यातील समस्या न सुटण्याला जसे काम न करणारे लोकप्रतिनि कारणीभूत आहेत, तसे काम न करणाऱ्या लोकांना निवडून देणारे लोकही तितकेच जबाबदार आहेत. परिणामी दिवा शहरातील जनतेने यावेळी परिवर्तन घडवायला हवं. जोपर्यंत दिव्यामध्ये विरोधी पक्षांचा आवाज बळकट होत नाही तोपर्यंत इथल्या समस्या सुटणार नाहीत,ही गोष्ट ही जनतेने लक्षात घ्यायला हवी. मनमानी कारभाराला जर आळा घालायचा असेल आणि नियोजन पद्धतीने दिवा शहराचा विकास करायचा असेल तर यावेळी जनतेने निर्धार करायला हवा, परिवर्तन करायला हवे.






