मुंब्रा पोलिसांना शैलेश पाटील यांचा इशारा
दिवा: शिवसेनेचे दिवा उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी दिवा परिसरातील दारू दुकानांबाहेर सर्रासपणे सुरु असलेल्या दारूच्या सार्वजनिक ठिकाणच्या सेवनावर आणि त्यातून नागरिक व महिलांना होणाऱ्या त्रासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाटील यांनी मुंब्रा पोलिसांना निवेदन देत तात्काळ दारू दुकाना बाहेर उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली असून, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनात शैलेश पाटील यांनी नमूद केले आहे की, दारू दुकानांसमोरच दारू पिणाऱ्यांची मोठी गर्दी असते आणि दुकानदार स्वतःच दारू पिण्यासाठी लागणारे पाणी, सोडा, चिप्स, फरसाण यांसारखे ‘पूरक’ साहित्य विकून या गैरप्रकाराला प्रोत्साहन देत आहेत. रस्त्यावर खुल्या पध्दतीने हा गैरप्रकार चालू असून दिवा शहरातील मुख्य ठिकाण असणाऱ्या दिवा टर्निंग येते दारुड्यांची गर्दी असते.येथे उघडयावर दारू पिण्याचे प्रकार होतात. यावर वेळीच कारवाई करावी अशी मागणी शैलेश पाटील यांनी केली आहे. नागरिकांच्या आक्षेपांनंतरही अनेक दारू दुकानदार बेजबाबदारपणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. दिवा परिसरात अनेक अवैध दारू दुकाने उघडपणे सुरु असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
पाटील यांनी विशेषत्वाने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधोरेखित केला.सर्व सामान्य कुटुंबातील महिला या परिसरातून जात असताना त्यांना अशा सार्वजनिक दारू पिणाऱ्यांमुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागते. “एखादी दुर्दैवी घटना घडल्याशिवाय पोलीस कारवाई करणार नाहीत का?” असा संतप्त सवाल त्यांनी निवेदनातून विचारला असून, पोलिसांनी तत्काळ पावले उचलणे अपेक्षित असल्याचे म्हटले आहे.
■ पाटील यांनी मुंब्रा पोलिसांकडून खालील तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे:
रस्त्यावर दारू पिणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.दारू दुकानादारांकडून ‘पूरक साहित्य’ विक्रीवर बंदी घालावी.परिसरातील दारू दुकानांवर सुरक्षेच्या दृष्टीने नियंत्रण ठेवावे.दुकानाबाहेर घडणाऱ्या गैरप्रकारांची जबाबदारी दुकानदारांवर निश्चित करावी. केवळ पैशासाठी समाजाची उपेक्षा न करता दुकानदारांनी स्वतःहून उपाययोजना कराव्यात.
“जर वरील सूचनांवर तात्काळ कार्यवाही झाली नाही, तर आम्हाला कायदा हातात घेऊन आंदोलन सुरू करावे लागेल, ज्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनावर असेल,” असा स्पष्ट इशारा पाटील यांनी दिला आहे. त्यांनी पोलिसांकडून लवकरात लवकर या प्रकरणी ठोस पाऊले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली.
पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.