दिवा: येथील नागरिकांची अनेक दिवसांची मागणी आता लवकरच पूर्ण होणार आहे. दिवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीला हिरवा कंदील दिला होता. त्यानुसार ठाणे महापालिकेने या संदर्भात पुढाकार घेत अश्वारूढ पुतळा उभारण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती दिवा शिवसेनेचे आदेश भगत यांनी दिली.
दिवा शहराचे शिवसेनेचे शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी या पुतळ्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीनुसार, महापालिकेने या पुतळ्यासाठी ठराव मंजूर केला असून, शिल्पकाराच्या निवडीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. लवकरच हा भव्य पुतळा दिवा चौकात दिसेल, अशी माहिती शिवसेनेचे उपशहरप्रमुख आदेश भगत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
याशिवाय, दिवा चौकाचे नाव याआधीच नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक असे ठेवले होते. आता या नामफलकाचे अनावरण उप शहरप्रमुख शैलेश पाटील आणि इतर माजी नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. ही आनंदाची बातमी दिवावासीयांना देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी एकत्र आले होते.ठाणे महापालिकेने रमाकांत मढवी यांना याबाबतचे पत्र देऊन याची अधिकृत माहिती दिली आहे अशी माहिती आदेश भगत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी माजी नगरसेवक शैलेश पाटील,विभाग प्रमुख उमेश भगत,शिवसेनेच्या युवा नेत्या साक्षी रमाकांत मढवी, विभाग प्रमुख भालचंद्र भगत, अमर पाटील,निलेश पाटील,दीपक जाधव यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.