ठाणे :- दिवा, मुंब्रा देवी कॉलनी येथील गणेश प्लाझा या इमारतीत राहणाऱ्या राहुल पंडित यांच्या रूममधील भारत गॅस सिलिंडरच्या
नोझलमधून गळती होऊन शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. या घटनेत, घरातील ए.सी. युनिट, वॉशिंग मशीन, किचन मधील भांडी इतर साहित्य व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळाल्याची माहिती समोर आली आहे.
दिवा, मुंब्रा देवी कॉलनीत गणेश प्लाझा नावाची तळ अधिक सहा मजली इमारत आहे. या इमारतीच्या तीन मजलीवरील पंडित यांच्या मालकीच्या ३०४ रूम मध्ये गॅस सिलिंडरच्या नोझलमधून गळती होऊन अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शीळ अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. लागलेली आग स्थानिक रहिवासी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पूर्णपणे नियंत्रणात आणली. तसेच गळती होत असलेला गॅस सिलिंडर भारत गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसली तरी घरातील एसी युनीट, वॉशिंग मशीन, किचन मधील भांडी इतर साहित्य व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळून खाक झाली आहे. यावेळी, एक फायर आणि एक रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आली होती अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.






