भाजपच्या ‘सायलेंट मोड’मुळे कोणाचे भवितव्य धोक्यात?
सुहास खंडागळे
दिवा:ठाणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर आता दिवा शहरातील राजकारण अत्यंत निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपले आहे. विशेषतः दिवा प्रभाग समितीमधील प्रभाग क्रमांक २७, २८ मधील लढतींकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, येथील राजकीय समीकरणे दररोज बदलताना दिसत आहेत. यंदाच्या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्यक्ष रिंगणात ताकदीने उतरू न शकलेल्या भारतीय जनता पार्टीच्या मतदारांच्या हातातच संपूर्ण दिवा शहराचे राजकीय भवितव्य असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दिवा शहरात भारतीय जनता पार्टीचा खूप मोठा मतदार वर्ग आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत जेव्हा भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते, तेव्हा भाजपने दिव्यात दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. अनेक जागांवर भाजपचा पराभव केवळ ५०० ते ८०० मतांच्या अल्प फरकाने झाला होता. आजच्या घडीला एकहाती सत्ता आणण्या इतपत ताकद भाजपकडे असतानाही, महायुतीच्या जागावाटपात भाजपला प्रभाग २९ मध्ये केवळ एक जागा मिळाली आहे, तर मूळ दिवा शहर समजल्या जाणाऱ्या प्रभाग २७ आणि २८ मध्ये पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. या अनपेक्षित निर्णयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. काहींनी अपक्ष अर्ज भरले होते मात्र नंतर ते मागे घेण्यात आले. प्रभाग 27 मध्ये आजही एक भाजप पदाधिकारी अपक्ष म्हणून रिंगणात आहे.
दुसरीकडे, निवडणुकीच्या मैदानात प्रभाग क्रमांक २८ मध्ये शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) अशी थेट आणि चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. मात्र येथे मनसे स्वतंत्र लढत असल्याने याचा फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता अधिक आहे.प्रभाग २७ मध्ये सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात त्रिकोणी संघर्ष रंगला आहे. मनसेने प्रभाग २७ आणि २८ मध्ये उमेदवार उभे केल्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात विरोधी मतांची विभागणी होण्याची दाट शक्यता आहे. राजकीय या मतविभाजनाचा थेट फायदा शिवसेना शिंदे गटाला होऊ शकतो. मात्र, या गणितात भाजपचा ‘सायलेंट’ मतदार सर्वात मोठा फॅक्टर ठरणार आहे.
भाजपच्या अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेत महायुती सोबत राहण्याचा निर्णय घेतला असला तरी भाजपचे काही नेते शांत आहेत.या शांत राहण्याचा फटका शिवसेना शिंदे गटाला बसणार की याचा छुपा फायदा विरोधातील शिवसेना ठाकरे गटाला होणार, याबाबत दिवा शहरात चर्चांना उधाण आले आहे. याच सोबतीला वंचित बहुजन आघाडीनेही काही जागांवर आपले उमेदवार उतरवून निवडणुकीत रंगत आणली आहे. जरी सर्व प्रमुख पक्ष रिंगणात असले, तरी निवडणुकीचे खरे सूत्रधार भाजपचे मतदारच ठरणार आहेत.
महायुतीचा घटक पक्ष म्हणून भाजपने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला असला, तरी कार्यकर्त्यांच्या मनात असलेली जागावाटपाची सल निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकते. त्यामुळे १५ तारखेला होणाऱ्या मतदाना दिवशी भाजपचा हक्काचा मतदार कुणाच्या पारड्यात आपले मत टाकतो, यावरच दिव्यातील भावी नगरसेवकांचे नशीब अवलंबून आहे. थोडक्यात सांगायचे तर, दिव्यातील सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांना भाजपच्या ‘सायलेंट’ मतदारांची मनधरणी करावी लागणार आहे.






