ठाणे शहरात १०० तर मिरा भाईंदर मध्ये ६० बसेस परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल होणार
नवी दिल्ली – दिल्ली संसद भवन येथे आज नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाच्या स्थायी समितीची बैठक श्री. मंगुठा श्रीनिवासुलूरेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर बैठकीत पीएम – ई बस सेवा योजनेच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. देशातील विविध शहरांमध्ये परिवहन सेवा समृध्द व्हावी या करता केंद्र सरकारच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत होत असल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी प्रथम केंद्र सरकारचे आभार मानले.
संपूर्ण भारतात १० हजार बसेस केंद्र सरकारद्वारे नव्याने पुरविण्यात येणार आहेत. ठाणे शहरात १००, मिरा भाईंदर मध्ये ६० बसेस या योजनेद्वारे देण्याचे काम प्रगतिपथावर सुरु आहे. या योजनेत केंद्र सरकार १० वर्ष बस चालविण्यासाठी जे अनुदान देत आहेत त्या मध्ये वाढ करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. तसेच महानगरपालिका, नगरपालिका प्रशासनास २०० कि.मी. प्रतिदिन अंतर चालविण्याचे उद्दिष्ट दिले आहे ते कमी करण्याचे म्हणजेच १५० कि.मी. प्रतिदिन ठेवण्याची आग्रही मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. तसेच ठाणे लोकसभा क्षेत्रासाठी वाढीव बसेसचीही मागणी नरेश म्हस्के यांनी बैठकीत लावून धरली.
सदरच्या बैठकीत संपूर्ण देशभरात या योजनेच्या अंतर्गत सुरु असलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच ई बसेसच्या अंतर्गत येणाऱ्या तांत्रिक अडचणी, बॅटरींची समस्या वैगेरे बाबतीत खासदार नरेश म्हस्के यांनी प्रश्न उपस्थित केले.
स्मार्ट ट्रॅकिंग सिस्टम, हरित ऊर्जा पेमेंट सिक्युरिटी पध्दत, जुन्या प्रदुषणकारी बसेस नष्ट कराव्या, ई बसेसचे होणारे अपघात टाळण्याकरता चालक-वाहक यांना विशेष प्रशिक्षण देण्याविषयी खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत महत्वपूर्ण सूचना केल्या.






