दिवा:-शहरातील मुंब्रा देवी कॉलनी येथे भीषण पाणीटंचाई नागरिकांना भेडसावत आहे. येथील महिला पाणी समस्येने हैराण आहेत. मुंब्रा देवी कॉलनी मधील शांतीनगर परिसरातील महिलांनी नुकतेच आपल्या समस्या भाजपच्या दिवा महिला मंडळ अध्यक्ष ज्योती पाटील यांच्या कानावर घातल्या. ज्योती पाटील यांनी शांतीनगर भागातील महिलांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या.पाणी समस्या गंभीर असल्याने महिलांचा संपूर्ण दिवस पाणी भरण्यात जात असतो.महिलांना दिवा शहरात अन्य ठिकाणी जाऊन दोन दोन हांडे पाणी आणावे लागते. अनेक इमारती व चाळींमध्ये तीन ते चार दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांनी प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भाजपच्या महिला मंडळ अध्यक्षा ज्योती पाटील यांनी महिलांच्या समस्या जाणून घेऊन पालिका प्रशासनाकडे पाणी समस्येबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन या महिलांना दिले आहे.






