आ. संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश
ठाणे: माजीवड्यातील रुनवाल रिजन्सीजवळील उद्यान ठेकेदाराकडून अतिक्रमित करण्यात आले होते. आमदार संजय केळकर यांनी जन आंदोलनाचा इशारा देताच ते खुले करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. उद्यानापासून वंचित परिसरातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.
ठाण्यात विकास प्रकल्पांची कामे सुरू असून एका ठेकेदाराने माजिवड्यातील उद्यानाभोवती पत्रे ठोकून अतिक्रमण करण्याचा डाव आखल्याची तक्रार स्थानिकांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे केली होती. याबाबत त्यांनी प्रभाग समिती आणि महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता हा प्रकार त्यांना माहीतच नसल्याची माहिती मिळाली. केळकर यांनी नाराजी व्यक्त करत आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्या निदर्शनास ही बाब आणली. नागरिकांसाठी तत्काळ हे उद्यान खुले करण्याची मागणी त्यांनी केली. अन्यथा स्वतः रस्त्यावर उतरून उद्यान खुले करू, असा इशाराही प्रशासनाला दिला
जन आंदोलनाची मात्रा चांगलीच लागू पडल्याचे आज बुधवारी दिसून आले. ठेकेदाराकडून उद्यानाला ठोकलेले पत्रे काढण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्याची पाहणी गुरुवारी केळकर यांनी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत केली.
उद्यान खुले झाल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार केळकर यांचे आभार मानले. ठेकेदाराकडून हे उद्यान बळकावण्याचा डाव होता. आमदार केळकर यांनी वेळीच आक्रमक भूमिका घेतल्याने परिसरातील बालगोपाळ आणि नागरिकांना हक्काचे उद्यान मिळाल्याची भावना येथील रहिवासी सचिन शिणगारे यांनी व्यक्त केली.






