दिवा:- शिवसेनेचे उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भाऊबीज कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी दिव्यातील शेकडो महिलांना भाऊबीजेची भेट म्हणून साडीचे वाटप करण्यात आले.
शैलेश पाटील यांच्या दिवा येथील जनसंपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिव्यातील शेकडो महिला श्री. पाटील यांना ओवाळण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जमल्या होत्या. यावेळी महिलांनी शैलेश पाटील यांना भाऊबीज निमित्त ओवाळणी केली.
या कार्यक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, ज्यामुळे कार्यालयाबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी सर्व उपस्थित महिला भगिनींना भाऊबीजेची भेट म्हणून साडी देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली.






