शानू पठाण यांची ठामपाकडे मागणी
ठाणे :- सोमवार आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे गोरगरीबांचे संसार वाहून गेले आहेत. या प्रकारास ठाणे महानगर पालिकेची यंत्रणाच जबाबदार आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्या सर्वांना ठामपाने तातडीची मदत म्हणून पन्नास हजार रूपयांचे अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी मा. विरोधीपक्ष नेते शानू पठाण यांनी केली आहे.
ठाणे महानगर पालिकेच्या अखत्यारित असलेल्या ठाणे शहरातील काही परिसर, कळवा पूर्व, मुंब्रा, कौसा, दिवा आदी भागातील सखल वस्त्या जलमय झाल्या. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांचे धान्य, अंथरूण- पांघरून, कपडालत्ता वाहून गेले आहे. पाणी शिरलेल्या अनेक वस्त्यांना शानू पठाण यांनी भेट दिली. कंबरभर पाण्यातून वाट काढत त्यांनी गोरगरीबांना मदतीचा हात दिला. तसेच, पाण्यात अडकलेल्या अनेकांना सुरक्षितस्थळी नेले.
याबाबत शानू पठाण यांनी, या नुकसानीस ठामपा प्रशासनच जबाबदार आहे. योग्य रितीने नालेसफाई केली असती नाले तुंबलेच नसते. आज शेकडो गोरगरीब लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. आयुष्यभर परिश्रम घेऊन जमा केलेल्या साधनांचा पाण्यात भिजून लगदा झाला आहे. त्यामुळेच ठाणे पालिकेने तत्काळ पंचनामे करून ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्यांना प्रत्येकी 50 हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली.