मोकाट वाळु माफियांना चाप बसवा – आ. संजय केळकर.
ठाणे: – ठाणे जिल्ह्यात अवैध वाळू माफियांचे प्रस्थ वाढले असून शासकिय धोरणांची पायमल्ली करीत अधिकाऱ्याशी संगनमताने महसुलाची लुट सुरू आहे. या मोकाट वाळू माफियांना चाप बसवा, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आ. केळकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार ठाणे जिल्ह्यातील दिवा, कळवा, मुंब्रा हा परिसर मोठ्या प्रमाणात खाडी किनाऱ्यालगत असून तेथील नागरिक लहान-मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. पूर्वी रेती उपसा करण्यास शासनाची परवानगी होती. मध्यंतरी शासनाने आपले धोरण बदलून ऑनलाइन यंत्रणा सुरू केली. परंतु शासनाच्या त्या धोरणांकडे दुर्लक्ष करून व शासनाचा कोणताही महसूल न भरता अवैध वाळू उपसा कशेळी ते दिवा खाडी पट्ट्यात सर्रास सुरू आहे. मोठमोठे बाज यांत्रिक पद्धतीने काही परिसरात उभे करून दिवसरात्र अवैध वाळूचा उपसा केला जात आहे. या प्रकारामुळे अनेक धोके निर्माण झाले असल्याने स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध होत आहे, त्यामुळे वाळू माफियांकडून धमकावले जात आहे. तथापि अवैध वाळू उपश्याबाबत संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. तथापि सदर ठिकाणी अवैध वाळू उपसा अधिकाऱ्यांच्या संगनमताने, आशीर्वादाने सुरू असून शासनाचा महसूल बुडत असल्याने मोठ्या प्रमाणात शासनाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप केळकर यांनी निवेदनातून केला आहे.
याबाबत तातडीने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून तेथील अवैध रेती उपशाला प्रतिबंध घालण्याची मागणी आ. संजय केळकर यांनी केली आहे.