मुख्यमंत्र्यांनी दिली शहरातील विसर्जन घाटांना भेट
ठाणे : अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जनस्थळांवर एकूण ६ हजार ४३५ गणेश मूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. त्यात ७४६ सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीही होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणाऱ्या ठाणे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रीम तलावांमध्ये ३ हजार ७१७ तर, विशेष टाकी व्यवस्थेत ३३९ गणेश मूर्तींचे भाविकांनी विसर्जन केले. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंदा तलाव, खारीगाव आणि ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील विसर्जन घाटांना भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली. तसेच विसर्जन सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना विविध सेवा पुरवणाऱ्या सामाजिक संस्थेच्या मंडपाना भेटी देऊन त्यांच्या कार्याबद्दल त्यांचे मा. मुख्यमंत्री महोदय यांनी कौतुक केले तसेच गणेशभक्तांशी संवाद साधला.
दरम्यान, महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहेत.