रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट
दिवा:- शहरातील १८ वर्ष जुन्या अनंत पार्क या रहिवासी सोसायटीवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारल्यानंतर रहिवासी चांगलेच आक्रमक झाले असून कारवाईसाठी आलेल्या महानगर पालिकेच्या पथकाला रहिवाशांनी रस्त्यावर आंदोलन करून माघारी परतवलं होत. बेघर व्हावं लागणार असल्याने रहिवासी चांगलेच हवालदिल झाल्याने रहिवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली.
अनंत पार्क सोसायटीला नोटीस आल्यापासून शिवसेना या रहिवाशांसोबत आहे. महापालिकेला विरोध करण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वात सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरून महापालिकेच्या कारवाईला विरोध दर्शवला होता. यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कारवाई साठी आलेल्या अधिकाऱ्यांशी फोन वर चर्चा केल्यानंतर अखेर पालिकेला कारवाई थांबवावी लागली. १८ वर्ष जुन्या अनंत पार्क सोसायटी संदर्भात कायदेशीर मार्ग काढण्याचं काम सुरू असून एकही रहिवाशाला बेघर होऊ देणार नसल्याचे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित रहिवाशांना दिले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी, उपशहरप्रमुख शैलेश पाटील, उपशहरप्रमुख अँड आदेश भगत, गणेश मुंडे, अमर पाटील, दीपक जाधव, विभागप्रमुख उमेश भगत, चरणदास म्हात्रे, विनोद मढवी, निलेश पाटील, शशिकांत पाटील, जगदीश भंडारी, अरुण म्हात्रे, सचिन चौबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.