समतोल फाउंडेशनच्या अन्नछत्र उपक्रमाला ३००० दिवस पूर्ण..
ठाणे:- गेली ३००० दिवस अखंडपणे सुरू असलेला हा अन्नछत्र उपक्रम म्हणजे काही इव्हेंट नाही. आणि या उपक्रमाला मदत करणाऱ्यांना पुरस्कार देण्याचीही गरज भासत नाही. कारण उपाशी असलेल्यांना अन्न दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य पसरते तो खरा पुरस्कार, अशा शब्दांत आमदार संजय केळकर यांनी उपक्रमात योगदान देणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
समतोल फाउंडेशनच्या अन्नछत्र उपक्रमाला ३००० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त श्री ज्ञानदेव सेवा मंडळ सभागृह, पाचपाखाडी येथे विजयादशमीला कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष, आमदार संजय केळकर यांनी या उपक्रमाला मदत करणाऱ्या शेकडो हातांना धन्यवाद दिले. यावेळी विधानपरिषदेचे सदस्य ॲड. निरंजन डावखरे, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार, भाजपाचे शहर अध्यक्ष संदीप लेले, संजय वाघुले, ‘समतोल’चे संस्थापक सचिव विजय जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री.केळकर म्हणाले, आरंभशूर व्यक्ती, संस्था खूप दिसतात. एखादा उपक्रम मोठा गाजावाजा करून सुरू करतात आणि नंतर तो बंद पडतो. समतोल फाऊंडेशनचे अनेक उपक्रम वर्षानुवर्षे सुरू आहेत, आणि पुढेही सुरू राहतील. अन्न छत्र हा देखील असाच एक उपक्रम असून या उपक्रमाला विजयादशमीला ३००० दिवस पूर्ण होत आहेत. हा उपक्रम म्हणजे काही इव्हेंट नाही आणि अन्नदान म्हणजे काही दान नाही तर ती भावना आहे. या विचारामुळेच या उपक्रमाला आठ वर्षे पूर्ण झाली. या उपक्रमाला शेकडो लोकांचे हात लागले आहेत. एका हाताने दिलेले दुसऱ्या हाताला कळत नाही. त्यांना पुरस्काराची अभिलाषा देखील नाही. उपाशी पोटात अन्न गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य उमलते, तोच खरा पुरस्कार आहे, अशा भावना आहे.केळकर यांनी व्यक्त केल्या.
सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांचे अडचणीत असलेले नातेवाईक आणि येथील कर्मचारी सुद्धा या अन्नछत्राचा लाभ घेत आहेत. फिरत्या अन्नछत्राचाही निराधार नागरिक लाभ घेत आहेत. रोज सुमारे ४०० ते ५०० नागरिकांना दर्जेदार आणि सकस आहार या उपक्रमातून आम्ही देत आहोत. त्यामुळे रोज पाच हजारावर खर्च होत आहे. वाढदिवस, होर्डिंग, जल्लोष करणाऱ्यांनी हा खर्च टाळून अशा उपक्रमात योगदान द्यायला हवे, असे आवाहन करतानाच श्री.केळकर यांनी लोकांनी लोकांसाठी चालवलेले अन्नछत्र आम्हाला करायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली.
समतोल फाउंडेशनची माहिती देताना श्री.केळकर म्हणाले, संस्थेचे १८ स्वयंसेवक रेल्वे स्थानकांवर फिरत असून घर सोडून पळून आलेली, भरकटलेली मुले हेरून त्यांना संस्थेच्या निवारा केंद्रात आणले जाते. त्यांना शिक्षण संस्कार देऊन त्यांचे मनपरिवर्तन करून पालकांचा शोध घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द केले जाते. आजवर अशा हजारो मुलांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे काम संस्थेने केले आहे. निराधार भटकणारी मुले भविष्यात गुन्हेगार होऊन राष्ट्रावर भार होणार असतात, पण संस्थेने अशा शेकडो मुलांना समाजात पुन्हा आणले आहे. संस्थेने सुरू केलेल्या स्कूल इन बस या उपक्रमाला राज्य शासनाने देखील स्वीकारल्याची माहिती श्री.केळकर यांनी दिली.
यावेळी अन्नछत्राचे तीन हजार दिवस हा दृकश्राव्य माहितीपटही दाखवण्यात आला. तसेच उपक्रमास मदत करणाऱ्या व्यक्तींना आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते कृतज्ञता पत्र देऊन गौरविण्यात आले.