पठाण पिता-कन्येने रस्त्यावर उतरून राबविले सफाई अभियान
ठाणे :- सलग दोन दिवसांच्या पावसाने मुंब्रा आणि परिसरात पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. साचलेले पाणी ओसरले असले तरी गाळ तसाच राहिला होता. हा गाळ हटविण्यासाठी बुधवारी सकाळीच आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेवरून शानू पठाण आणि त्यांची कन्या मर्जिया पठाण रस्त्यावर उतरले. अवघ्या तीन तासात अनेकांच्या घरातील , रस्त्यावर साचलेला गाळ आणि कचरा हटवून परिसर चकाचक केला.
मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंब्रा परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. तसेच, नागरिकांच्या घरात नाल्यातील राळारोडा जमा झाला होता. रस्त्यांवर गाळाचा थर जमा झाला होता. हा गाळ हटविण्यासाठी शानू पठाण आणि मर्जिया पठाण यांनी सकाळीच वेगवेगळ्या टिम तयार करून सफाई अभियान राबविले. रस्त्यावरील तसेच नागरिकांच्या घरातील गाळ साफ केला. याबाबत शानू पठाण यांनी सांगितले की, नालेसफाई जरी केली असली तरी ती योग्य पद्धतीने झाली नाही. यंत्रणेचा वचक नसल्याने कामचलाऊ नालेसफाई करण्यात आली. त्याचा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागला. नागरिकांचे खूप नुकसान झाले आहे. त्याची भरपाई ठाणे पालिकेने केलीच पाहिजे, अशी मागणी केली.