दिव्यातील पाणी प्रश्नावर जवळपास सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांची आंदोलने… पत्रव्यवहार
■ सुहास खंडागळे/दिवा न्यूज विशेष
आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत दिवा शहरात पाणी प्रश्न हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार असे संकेत विरोधकांकडून मिळत आहेत.मागील दोन अडीच वर्षांपासून महापालिका इलेक्शन कधी लागणार याची चर्चा होत असताना सुरुवातीलाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिवा महिला संघटिका ज्योती पाटील यांच्या वतीने पाणी आंदोलन हाती घेऊन दिव्यातील पाणी समस्येला वाचा फोडण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी देखील दिव्यातील पाणी प्रश्नावर मागील पाच वर्षांपासून आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरत आहेत.महिलांचे प्रश्न घेऊन ज्योती पाटील या पाणी समस्येवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून लढत असतानाच दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, भाजपचे विजय भोईर त्याचबरोबर रोशन भगत हे देखील पाणी प्रश्नावर महापालिका प्रशासनाला जाब विचारताना दिसत आहेत.
पालिका प्रशासनाला दिव्यातील पाणी समस्येबाबत अनेक वेळा भाजपने ही धारेवर धरले आहे. एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पार्टी पाणी प्रश्नावर वेगवेगळ्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे आवाज उठवत असतानाच अलीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख प्रकाश पाटील यांनी देखील उपोषण करत दिवा शहरातील पाणी प्रश्नाला वाचा फोडली.सलग चार दिवस प्रकाश पाटील यांनी दिवा स्टेशन येथे पाणी प्रश्नावर आंदोलन केले.
पालिका प्रशासनाने त्यांना कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.मात्र त्यांनी आपला लढा वेगवेगळ्या माध्यमातून सुरूच ठेवला आहे. मनसेचे शहराध्यक्ष तुषार पाटील व प्रशांत गावडे हे देखील पाणी प्रश्नावर महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पत्र व्यवहार करताना दिसतात. वंचितचे विकास इंगळे,अमोल केंद्रे यांनीही त्यांच्या स्तरावर पाणी प्रश्नासाठी आवाज उठवला आहे.एकंदरीत दिवा शहरात पाणी प्रश्न अस्तित्वात आहे.
नागरिकांना पाणी समस्या भेडसावत आहे. याचेच प्रतिबिंब विरोधकांच्या पत्रव्यवहार आणि आंदोलनामधून दिसत आहे. काही ठराविक भागांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होतो.मात्र अनेक भागांना आजही पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत असताना नागरिकांच्या महिन्याचे आर्थिक गणित कोलमडते.परिणामी विरोधी पक्षांकडून हा मुद्दा पालिका प्रशासनाकडे मांडला जात असून त्यावर पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. दिवा शहरातील अंतर्गत जलवाहिन्या या मागील पाच वर्षात टाकण्यात न आल्याने अनेक भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो.जोपर्यंत अंतर्गत जलवाहिन्या टाकल्या जात नाहीत तोपर्यंत दिवा शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळणार नाही अशी भूमिका या आधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिवा शहर संघटिका ज्योती पाटील यांनी मांडली होती. तर दुसरीकडे मनसेचे प्रकाश पाटील यांनीही केलेल्या उपोषणादरम्यान टँकर लॉबीला जर पाणी मिळते तर जनतेला पाणी का मिळत नाही हा प्रश्न उपस्थित केला होता. भारतीय जनता पार्टीचे विजय भोईर यांनी दिवा शहरातील जनतेला अजून किती दिवस विकतचे पाणी घ्यावे लागणार असा सवाल या आधीच उपस्थित केला आहे.तर भाजपचे सचिन भोईर आणि रोशन भगत यांनी साबे दिवा भागातील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत असल्याचा प्रश्न उपस्थित केला आहे.
एकंदरीत विरोधकांमध्ये पाणी प्रश्न दिवावासीयांना भेडसावत असल्याबाबत एकमत दिसते. दिवा शहरातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी विरोधकांकडून होत असताना पालिका प्रशासन मात्र त्यावर ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरले आहे. सर्वच विरोधी पक्ष दिव्यातील पाणी प्रश्नावर सातत्याने बोलत असूनही महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत पाणी प्रश्न हा दिवा शहरात महत्त्वाचा मुद्दा ठरणार असेच दिसत आहे. शहरातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी दिवा शहरातील विरोधी पक्षाचे पदाधिकारी आंदोलन,पत्रव्यवहार करत असताना महापालिका प्रशासनाकडून न होणाऱ्या ठोस उपाययोजना हाच आगामी महापालिका निवडणुका मधील महत्त्वाचा मुद्दा ठरेल असे दिसते.