रोटरीच्या शांती पर्व कार्यक्रमात आ. केळकर यांनी टोचले कान..
ठाणे:- रोटरीच्या माध्यमातून शांतिपर्व हा उपक्रम खरंतर राजकारणी लोकांसाठी घ्यावा, कारण आत्मीय शांततेची खरी गरज राजकारण्यांना आहे. असे परखड मत व्यक्त करून आमदार संजय केळकर यांनी एकप्रकारे समस्त राजकारण्याचे कान टोचले.
रोटरी चळवळ १२० वर्षांपूर्वी २३ फेब्रुवारी रोजी सुरू झाली, तो दिवस जागतिक शांतता दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधुन, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थने नौपाडा, विष्णुनगरमधील मनपा शाळा क्रमांक १९ येथील रोटरी सेंटरमध्ये शांतीपर्व-स्पेक्ट्रम ऑफ पीस चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी आ.संजय केळकर बोलत होते.
याप्रसंगी, आ.निरंजन डावखरे, रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता, माजी प्रांतपाल डॉ.मोहन चंदावरकर, रोटरीचे माजी अध्यक्ष राजेश परांजपे, रोटरीच्या जिल्हा संचालक स्मृती गुलवाडी, रोटरी ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा मेधा जोशी, पल्लवी फौजदार, जिल्हा सचिव संतोष भिडे, क्लब सेक्रेटरी अमोल नाले उपस्थित होते. आ. केळकर यांनी रोटरीच्या उपक्रमांचे कौतुक करून अभिनंदन केले. रोटरीचा शांतिपर्व हा उपक्रम खरंतर राजकारणी लोकांसाठी घ्यावा कारण आत्मीय शांततेची खरी गरज राजकारण्यांना आहे. जर स्वतःचे मन शांत असेल तरच आपण दुसऱ्याचे मन शांत करू शकू आणि एक आदर्श पिढी घडवू शकवू असेही यावेळी त्यांनी सांगितले.आ. डावखरे यांनीही जगातील विदारक स्थिती आणि युद्धपातळीवर शांतता प्रस्थापित करणे हाच एकमेव उपाय मानवजातीकडे कसा आहे यावर भाष्य केले.
शांतीपर्वाच्या या सत्रात सनदी अधिकारी अजय वैद्य यांनी ‘पीस ईन गव्हर्नन्स’, पुण्याच्या एमआयटी कॉलेजचे असोसिएट डीन मिलिंद पात्रे यांनी ‘पीस थ्रु ॲकेडेमिक्स’, कर्नल मानस दीक्षित यांनी ‘वॉर,अँटी वॉर ॲण्ड पीस, यावर तर प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. उल्का नातू यांनी ‘एकस्प्लोरींग इनर पीस’ यावर आणि संगीत थेरपीच्या द्वारे रुग्णोपचार करणारे डॉ. राहुल जोशी यांनी ‘हार्मोनी इन पीस’ यावर महत्वपूर्ण मार्गदर्शन करून दैनंदिन जीवनात शांततेचे महत्व किती आहे, यावर प्रकाश टाकला.
रोटरी क्लबने पीस स्कॉलरशिपसह मास्टर्स आणि सर्टिफिकेट कोर्सेस सुरू करण्यासाठी नऊ शिक्षण संस्थांसोबत सहकार्य केले आहे. या रोटरी पीस फेलोशिप प्रोग्रामचे कौशल्य आणि अनुभवाची व्याप्ती यावेळी स्पष्ट करण्यात आली. २००२ पासुन सुरू झालेल्या या उपक्रमाचा १८०० उमेदवारांनी लाभ घेतला असुन यात सुमारे ५० जण भारतातील आहेत. येत्या १५ मे पर्यंत ऑनलाईन प्रवेश घेता येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी दोन शांतता अभ्यासक रुक्मिणी अय्यर आणि सागर गांगुर्डे यांनी कार्यक्रमात त्यांचे अनुभव कथन केले.