ठाणे: खासगी नर्सिंगचे प्रमाणपत्र ग्राह्य मानले जात नाहीत. हे कारण पुढे करत कोणतीही पूर्व सूचना न देता ६० हून अधिक परीचारिकांना आपला दवाखान्याचे संचालकांनी कामावरून तडकाफडकी कमी केले. तसेच दोन महिन्यांचे वेतन देखील अदा करण्यात न आल्याने त्याच्या निषेधार्थ मंगळवारी आपला दवाखान्यातील परिचारिकांनी महापालिकेवर धडक दिली. तसेच आरोग्य विभागाकडे धाव घेत, उप वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. यावेळी उप वैद्यकीय अधिकारी राणी शिंदे यांनी
आपला दवाखान्याचे संचालक यांच्याशी चर्चा केली असता, संचालकांनी देखील वेतन अदा करण्याबाबत सकारात्मक दर्शविली असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
ठाणे शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्याची सुविधा ठाणे महापालिकेच्या माध्यमातून उपल्बध व्हावी, यासाठी पालिका प्रशासनाकडून पावले उचलण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार तत्कालीन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ठाणे महानगर पालिकेच्या माध्यामतून ठाणे शहरातील गोरगरीब रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार मिळावे, यासाठी दिल्लीतील मोहोल्ला क्लिनिकच्या धर्तीवर वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मेडोंगो कंपनीच्या माध्यामतून ठाणे पालिका क्षेत्रात आपला दवाखाना सुरू करण्यात आला. या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना मिळणाऱ्या योग्य आरोग्य सुविधेमुळे अल्पावधीतच हा दवाखाना लोकप्रिय होऊ लागला. असे असले तरी, गेल्या काही महिन्यांपासून या दवाखान्याबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरत आहे. अशातच मंगळवारी खासगी नर्सिंगचे प्रमाणपत्र ग्राह्य मानले जात नसल्याचे कारण पुढे करत कोणतीही पूर्व सूचना न देता ६० हून अधिक नर्सेसना आपला दवाखान्याचे संचालकांनी कामावरून तडकाफडकी कमी करण्यात आले. तसेच दोन महिन्यांचे वेतन देखील अदा करण्यात न आल्याने त्याच्या निषेधार्थ त्या परिचारिकांनी आरोग्य विभागाकडे धाव घेतली होती.






