Homeठाणे-मेट्रोआयुक्तांशी फोनवरून चर्चा आणि टोईंग व्हॅनचे चाक रुतले..

आयुक्तांशी फोनवरून चर्चा आणि टोईंग व्हॅनचे चाक रुतले..

नागरिकांना अपेक्षित बदल केल्यानंतरच सेवा सुरू करणार – आयुक्त..
आमदार संजय केळकर यांची पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी चर्चा..

ठाणे:- टोईंग व्हॅनचा अनुभव ठाणेकरांना विशेषतः दुचाकीस्वारांना वाईट असून ही सेवा पारदर्शी नसल्याचे आमदार संजय केळकर यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना सांगितल्यानंतर जनतेला अपेक्षित बदल केल्याशिवाय ही सेवा सुरू करण्यात येणार नाही असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती श्री. केळकर यांनी दिली.

मागील सहा महिने बंद असलेली टोईंग व्हॅन सेवा ठाण्यात पुन्हा सुरू करण्यात आल्याने नागरिकांचा विरोध वाढू लागला आहे. भाजपच्या नगरसेवकांनी देखील वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्तांची भेट घेतली होती. नागरिकांनी याबाबत आपली कैफियत आमदार संजय केळकर यांच्याकडे मांडल्यानंतर श्री.केळकर यांनी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना फोन करून टोईंग व्हॅन सेवेवर प्रश्न उपस्थित केले. या सेवेचा नागरिकांना विशेषतः दुचाकीस्वारांना वाईट अनुभव आहे. या सेवेचे काम पारदर्शक नाही. नागरिकांना सेवेऐवजी त्रासच अधिक होतो, शिवाय दुजाभावही होतो. हे बदल केल्याशिवाय ही सेवा सुरू करण्यात येऊ नये, अशी नागरिकांची मागणी असल्याचे श्री. केळकर यांनी आयुक्तांशी बोलताना सांगितले.

यावर श्री. डुंबरे यांनी नागरिकांना अपेक्षित बदल करूनच या सेवेची अंमलबजावणी करण्यात येईल. नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने शास्त्रशुद्ध आणि पारदर्शक योजना तयार करू, तोपर्यंत ही सेवा सुरू करण्यात येणार नाही, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती श्री. केळकर यांनी दिली.

ही सेवा नागरिकांच्या आजवरच्या अनुभवानुसार वादग्रस्त असून वाहनचालकांच्या तक्रारी असतात. एकीकडे जनतेचे म्हणणे रास्त असताना दुसरीकडे प्रशासनही त्यांच्या योजनेसंदर्भात म्हणणे मांडत असते. नागरिकांच्या वाहतुकीसंदर्भात तक्रारी सोडवण्यासाठी मी नियमितपणे वाहतूक विभागाशी सुसंवाद ठेवून आहे. अनेक त्रासदायक योजना किंवा निर्णय मागे घेण्यासाठी प्रशासनाला भाग पाडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील असतो. टोईंग व्हॅनबाबतच्या नागरिकांच्या तक्रारीनुसार आज आयुक्तांशी चर्चा केली असून तक्रारीनुसार आवश्यक आणि अपेक्षित बदल केल्याशिवाय ही सेवा सुरू करण्यात येणार नसल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!