दिवा:- दिवा शहरातून अनेक प्रतिभावान खेळाडू सध्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. यातच आता दिवा शहराचा उदयोन्मुख क्रिकेटपटू कुमार रुद्र निलेश पाटील याची भारतातील अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिष्ठित अशा ‘इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग’ (ISPL) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रुद्रची या लीगमध्ये ‘श्रीनगर के वीर’ (Srinagar Ke Veer) या संघात निवड झाल्याने दिवा शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
टेनिस क्रिकेट विश्वात ‘आयएसपीएल’ ही स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. या मोठ्या स्पर्धेत रुद्र पाटील आपल्या खेळाची चुणूक दाखवणार आहे.
रुद्रच्या या घवघवीत यशाबद्दल दिवा शहर शिवसेनेचे शहरप्रमुख रमाकांत मढवी यांनी रुद्र निलेश पाटील याचे विशेष अभिनंदन केले आहे. मढवी यांनी रुद्रच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्याला स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. दिवा शहरातील एका युवा खेळाडूने राष्ट्रीय स्तरावर झेप घेतल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
रुद्र पाटील याच्या निवडीमुळे दिवा शहरातील क्रीडाप्रेमी आणि शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्याच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






