पुरावे देऊनही नावे वगळली नसल्याने खुलासा करण्याची शिवसेनेची लेखी मागणी
दोन दिवसांत मतदार यादीत पारदर्शकता आणा अन्यथा महाविकास आघाडी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करणार
ठाणे: ऐरोली,बेलापूर, ठाणे शहर,कोपरी पाचपाखाडी,कळवा मुंब्रा आणि मीरा-भाईंदरसह ठाणे जिल्हयात मतदार यादीत प्रचंड घोळ घातला आहे. अधिकारी आणि सत्ताधारी यांच्या आशीर्वादाने दुबार आणि बोगस मतदार घुसविण्यात आले असून पुरावे देऊनही नावे वगळली नाहीत. त्यामुळे लेखी खुलासा करण्याची मागणी शिवसेना नेते राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच दोन दिवसांत मतदार यादीत पारदर्शकता आणा अन्यथा महाविकास आघाडी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करणार असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. राजन विचारे यांनी आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी तसेच उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी यांना पत्राद्वारे दुबार नावे न वगळण्याची कारणे काय? याचा खुलासा लेखी स्वरूपात देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
नुकताच पार पडलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकी त ठाणे लोकसभा मतदार संघात बोगस मतदान मोठ्या प्रमाणात झाल्याने या बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी वारंवार जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी यांची भेट घेण्यात आली होती. या भेटीत ठाणे लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभा मतदार यादीतील दुबार नावे सॉफ्टवेअर द्वारे शोधून याची सॉफ्ट व हार्ड कॉपी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यावेळी सर्व दुबार नावे वगळण्याचे आदेश ही अधिकाऱ्यांना दिले, परंतु याची कोणतीही कार्यवाही योग्य रीतीने न झाल्याने राजन विचारे यांनी प्रशासनाबाबत खेद व्यक्त केले आहे.१ लाख ९३ हजार ३०२ पैकी ४ हजार ११९ दुबार नावे वगळण्यात आलेचे निदर्शनास आले आहे. तर ११ हजार ९६१ दुबार नावे वगळण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे सीईओ यांच्याकडे परवानगी मागितल्याचे ही समजते, परंतु निवडणूक जाहीर झाली असून अद्यापही नावे वगळण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने दिली नसल्याने याचा स्पष्ट लेखी खुलासा मागितला आहे.
आता दुबार नावाचे मतदार घेऊन पुरावे आणणार
नव्याने नोंदविण्यात आलेले मतदार यादीतील नावे वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रात वेगवेगळ्या यादीत घुसविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचे दिसून आले याचे पुरावे ही वारंवार अधिकाऱ्यांना देत होते परंतु कोणतीही दखल न घेतल्याने प्रशासना बाबत खासदार राजन विचारे यांनी खेद व्यक्त केले आहे. दरम्यान, याआधी कागदोपत्रे दुबार मतदारांची पुरावे दिले आता दुबार नावाचे मतदार घेऊन पुरावे आणणार असल्याचा इशारा विचारे यांनी दिला.






