ऑनलाईन खुल्या पर्यावरण शाळेची वर्षपूर्ती
ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘ऑनलाइन खुली पर्यावरण शाळा’ या उपक्रमाची वर्षपूर्ती नुकतीच झाली असून दुसऱ्या वर्षातील पहिले सत्र शुक्रवार, २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ४.०० वा. ‘गडांवरील पर्यावरण’ या विषयावर होणार आहे. गिर्यारोहक शेखर राजेशिर्के हे या सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना गिर्यारोहण आणि गिरीदुर्गभ्रमण क्षेत्रातील तीन दशकांचा अनुभव असून ‘डोंगरवाटा’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
आपल्या सभोवतालच्या परिसरातील जैवविविधता, माणसाची पर्यावरणातील भूमिका, प्रदूषण, कचऱ्याचे व्यवस्थापन, पाणीप्रश्न, पाणथळभूमीचे महत्त्व, पर्यावरण पूरक सण-उत्सव, निर्माल्य व्यवस्थापन या आणि अशा अनेक विषयांची माहिती तज्ञांकडून या ऑनलाईन खुल्या पर्यावरण शाळेत मार्गदर्शन केले जाते. आतापर्यंत या कार्यशाळेची ५२ सत्रे झाली आहेत. या सत्रांचे समन्वयन पर्यावरण संवर्धन, शिक्षण आणि जागृती या क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत असलेल्या पर्यावरण दक्षता मंच या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येते. या सत्रांमध्ये, पर्यावरण आणि मी, परिसंस्था, जैवविविधतेची ओळख, वॉटर ऑडिट, नैसर्गिक साधनसंपत्ती, पर्यावरणपूरक सण, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल, नैसर्गिक संसाधने, आरोग्य आणि पर्यावरण, रसायनमुक्त जीवनशैली, पारंपरिक व अपारंपरिक उर्जेचे महत्त्व अशा विविध विषयावर अभ्यासकांनी मार्गदर्शन केले आहे.
प्रा. विद्याधर वालावलकर, प्रणोती खानोलकर, सुरभी वालावलकर-ठोसर, शुभम निकम, डॉ. पुरुषोत्तम काळे, रुपाली शाईवाले, पौर्णिमा शिरगावकर, डॉ. श्रेया भानप, दा. कृ. सोमण, डॉ. महेश बेडेकर, डॉ. पुनम कुर्वे, डॉ. सुगंधा शेट्ये, डॉ. संजय जोशी, डॉ. विकास हजिरनीस, संगीता जोशी, डॉ. जयश्री कुळकर्णी, डॉ. अनिकेत ठोसर, डॉ. जयश्री कुळकर्णी, डॉ. आदित्य अकेरकर, राजेंद्र भट, डॉ. नीलिमा कुलकर्णी, डॉ. मानसी जोशी, डॉ. अपर्णा कुलकर्णी, अभय पावगी, हेमंत कारखानीस, अक्षय मांडवकर, डॉ. निलेश वाघ, डॉ. खुशबू टावरी, आनंद जगताप, आनंद शिंदे, मृगांक प्रभु, डॉ. नागेश टेकाळे, दिवाकर ठोंबरे, डॉ. सागर मराठे, डॉ. दिलीप काकविपुरे. डॉ. प्रसाद कर्णिक, डॉ. उमेश मुंडल्ये, अविनाश हरड, मनोहर पाटील या अभ्यासकांनी सोप्या भाषेत पर्यावरणाचे विविध पैलू उलगडून दाखवले आहेत.
खुल्या पर्यावरण शाळेची ही सर्व सत्रे ‘आपलं पर्यावरण’ (Apala Paryavaran) या संस्थेच्या यू ट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. ही ऑनलाइन खुली पर्यावरण शाळा यावर्षी सुद्धा सुरू राहणार असून ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दर शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजता पर्यावरण संवर्धनाशी संबंधित विविध विषय आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. सर्व पर्यावरणप्रेमींना या खुल्या पर्यावरण शाळेमध्ये नक्की सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे महापालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांनी केले आहे. या खुल्या पर्यावरणशाळेतील सहभागासाठी पर्यावरण दक्षता मंडळ : ८४४६१४०१८९ यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी.