दिवा:- दिवा विभागात गेल्या ८ ते १० दिवसांपासून कचरा उचलण्याचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून, यामुळे संपूर्ण परिसरात कचऱ्याचे मोठे ढीग साचले आहेत. रस्त्यांवरून चालणेही नागरिकांसाठी किळसवाणे झाले असून, पसरलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही पालिका प्रशासनाच्या घनकचरा विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
कचरा उचलून थेट कार्यालयासमोर टाकला:
पालिका प्रशासनाच्या या निष्काळजीपणाचा निषेध म्हणून आज, दिनांक २०.११.२०२५ रोजी भारतीय जनता पार्टीच्या (BJP) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अनोखे आणि आक्रमक आंदोलन छेडले.
भाजपचे शिष्टमंडळ: ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय अनंत भोईर, दिवा–शील मंडळ अध्यक्ष श्री. सचिन रमेश भोईर, महिला मोर्चा अध्यक्षा सौ. सपना भगत, तसेच रोशन भगत, प्रवीण पाटील, नितीन कोरगावकर, साधना सिंह, पुनम सिंह, अनुराग पाटील, विजय वाघ, कल्पेश सारस्वत यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
अनोखे आंदोलन: कार्यकर्त्यांनी दिवा विभागातील साचलेला कचरा स्वतः गोळा केला आणि तो थेट घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कार्यालयासमोर टाकून पालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने केली.
प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त असून, त्यांच्या संयमाचा बांध फुटल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले. आंदोलकांनी पालिका प्रशासनाचा तीव्र शब्दांत निषेध केला.
यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर तात्काळ कचरा उचलण्याची कार्यवाही सुरू न केल्यास, यापेक्षाही अधिक आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल आणि यापुढे होणाऱ्या गंभीर परिणामांची सर्वस्वी जबाबदारी पालिका प्रशासनाची असेल.






