दिवा शहराचा कल शिवसेना शिंदे गटाकडे?
■ सुहास खंडागळे
दिवा:- कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात दिवा शहर या वेळच्या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावणार असून दिवा शहर आणि परिसरातील सुमारे एक लाख 24 हजार मतदार पुढच्या आमदाराचे भवितव्य ठरवणार आहेत. त्यामुळे कल्याण ग्रामीण विधानसभा जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना दिवा शहर महत्वाचे असणार आहे.
विकासापासून दुर्लक्षित असणाऱ्या दिवा शहरात मागील पाच वर्षात बदलाचे वारे वाहू लागले आहेत. मागील पाच वर्षात महापालिका व शासन यांच्या माध्यमातून काही प्रश्न निश्चित सुटल्याची स्थिती आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू होणे महत्त्वाच्या रस्त्यांचे रुंदीकरण पाणी प्रश्न संदर्भात उपाय योजना किंवा रेल्वे स्थानकाचा विकास अशी अनेक कामे मागील पाच वर्षात झाली आहेत. शहरातील अंतर्गत पायवाटा रस्ते यांचा विकास मागील पाच वर्षात झाला असल्याचे नाकारता येत नाही.
एकीकडे पायाभूत सुविधा मजबूत होत असताना दुसरीकडे नागरी सुविधांबाबत आजही नागरिक असमाधानी आहेत. शहरातील शैक्षणिक सुविधा, आरोग्य, स्वच्छता, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी उपक्रम, गार्डन, खेळाची मैदाने,पाणी वितरण व्यवस्था असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या वेळच्या विधानसभा निवडणुकीत दिवा शहरातील मतदारांचा टक्का वाढल्याने दिवा शहरात राजकीय पक्षांकडून आश्वासनांची खैरात होईल.कल्याण ग्रामीणचा आमदार ठरवण्यात दिवा शहरातील मतदार निर्णायक भूमिका बजावणार असल्याने आगामी काळात या शहराचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने त्याचा फायदा होईल असं मत शहरातील नागरिक व्यक्त करत आहे.
■ दिव्याचा कल शिवसेना शिंदे गटाकडे ?
मनसेकडून कल्याण ग्रामीण मतदार संघात विद्यमान आमदार राजू पाटील हे उमेदवार असणार आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार सुभाष भोईर रिंगणात असणार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून अद्याप उमेदवार निश्चित झाला नसून ठाणे महापालिकेचे माजी उपमहापौर दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी यांचे नाव चर्चेत आहे. दिवा शहराबाबत बोलायचे झाल्यास संघटनात्मक बांधणी,मागील पाच वर्षात झालेली विकास कामे आणि सातत्याने दिवा शहरातील नागरिकांशी असलेला संपर्क यामुळे शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मढवी यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाल्यास दिवा शहरातून रमाकांत मढवी यांना नागरिकांची अधिक पसंती असल्याची चर्चा मतदारांत आहे.खासदार श्रीकांत शिंदे व ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दिवा शहरात होणारी विविध विकास कामे, यामुळे दिवा शहराचा कल मागील काही वर्षात हा शिवसेना शिंदे गटाकडेच असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटासमोर शिवसेना ठाकरे गट व मनसे दिवा शहरात आव्हान उभे करू शकतात का? हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.






