Homeठाणे-मेट्रोकळव्यातील अनधिकृतपणे सुरू असलेल्या भट्टीला आग ; चार जण बचावले

कळव्यातील अनधिकृतपणे सुरू असलेल्या भट्टीला आग ; चार जण बचावले

ठाणे:- घरात अनधिकृतपणे बनविण्यात आलेल्या पाणीपुरीच्या भट्टीला व घरातील इतर साहित्याला आग लागल्याची घटना रविवारी दुपारी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास कळव्यात समोर आली. या आगीवर जवळपास एक तासांनी नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आग लागली त्यावेळी घटनास्थळी चार कर्मचारी काम करत होते. त्यांनी वेळी तेथून बाहेर पळ काढल्याने ते बचावले असून या घटनेत पाणीपुरी भट्टीला, पीठ दळण्याची मशीन, इन्वर्टर, फ्रीज, कपाट इतर घरगुती साहित्य व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळाली आहे. तसेच घरच्या वरील काही सिमेंट पत्रे फुटले आहेत. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
कळवा, पौंडपाडा येथील भास्कर नगर रोड या ठिकाणी असलेल्या आदर्श मित्र मंडळ चाळमधील रूम क्रमांक १००० मध्ये ही भट्टी बनविण्यात आली आहे. रविवारी दुपारी चार कर्मचारी काम करताना ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कळवा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. तातडीने जवानांनी त्या आगीवर शर्थीने नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यावर आग जवळपास एक तासांनी नियंत्रणात आली. याचदरम्यान त्या घरामध्ये असलेले २- घरगुती व ३- व्यावसायिक सिलिंडर होते. ते सुरक्षेतेच्या कारणास्तव अग्निशमन दलाने ताब्यात घेतले. तसेच आग लागताच तेथून कर्मचारी सुरक्षितपणे बाहेर पडल्याने ते बचावले आहेत. अनधिकृतपणे भट्टी सुरू असलेले ते घर फुलबदन चौहान यांच्या मालकीचे असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

error: Content is protected !!