ठाणे : मुंबई-नाशिक मार्गावरील खारेगाव येथील खाडी पुलाच्या मधोमध काही अंतर सोडण्यात येतो. तो मोकळा भाग स्लॅब टाकून बंदीस्त करून दुभाजक तयार केला होता. त्याच दुभाजकाचा काही भाग कोसळून खाडीत पडल्याने त्या पडलेल्या भागातून थेट पाण्याचे दर्शन होत आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी मार्गरोधक लावण्यात आले आहेत. सध्या तो खाडी पुल मात्र सुस्थितीत असून या पुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. तसेच या दुभाजकाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येईल असेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
ठाणे खारेगाव खाडी पुल हा सुमारे ३० ते ३५ वर्षे जुना झाला असून त्याशेजारी नवी पुलांचे काम सुरू आहे. ते काम झाल्यानंतर जुना पुलाच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. असे असतानाच, शनिवारी रात्री खाडी पुलाच्या दुभाजकाचा काही भाग अचानक खाडीत कोसळून खाली पडला. याठिकाणी नवीन खाडी पुलाचे काम करीत असलेल्या कामगारांनी हा प्रकार पाहून राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी धाव घेऊन जो भाग पडला तेथे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मार्गरोधक लावले. या पुलावरून अवजड आणि खासगी वाहनांची वाहतूक सुरू आहे. हा पूल मुंबई महानगरातील इतर रस्त्यांना जोडल्याने हा मार्ग महत्वाचा मानला जातो. त्यातच या मार्गाला समृद्धी मार्ग जोडण्यात येणार असून त्यासाठी हा रस्ता रुंद करण्याचे काम जोरात सुरू आहे. त्यातच घटना घडल्यानंतर पुलावरील रस्ते सुस्थितीत असल्याने येथून वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे






