मनसेला कामाचे श्रेय जाऊ नये म्हणून काम थांबले का?मनसेचा सवाल
दिवा:- गणेश पाडा येथील गटाराचे काम आधीच सुरू केले आहे,सध्या हे काम थांबले असेल तर ते पावसापूर्वी काम पूर्ण होईल.तशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त प्रितम पाटील यांनी दिवा न्यूज सोबत बोलताना दिली.
गणेश पाडा येथील धोकादायक गटारामुळे अनेकांचे अपघात झाले आहेत.येथे वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन सदर गटाराची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी अशी मागणी दिवा मनसेचे तुषार पाटील यांनी पालिका आयुक्त आणि सहायक आयुक्त यांच्याकडे केली होती.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने याठिकाणी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले मात्र मागील काही दिवसांपासून हे काम बंद असल्याचे समोर आल्यानंतर दिवा न्यूजने सहायक आयुक्त प्रितम पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी बोलताना सहायक आयुक्त प्रितम पाटील म्हणाले की,या गटाराचे काम आधीच सुरू करण्यात आले आहे.जर आता ते काम थांबले असेल तर ते सुरू करण्याच्या सूचना देण्यात येतील. पावसाळ्याआधी या गटाराचे काम पूर्ण होईल अशी माहिती प्रितम पाटील यांनी दिली.
दरम्यान त्यावेळी सुरू झालेले काम थांबविण्यात का आले? असा सवाल आता मनसेचे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी विचारला आहे.जर एखाद्या गंभीर विषयावर पालिका प्रशासन तातडीने काम सुरू करत असेल तर हे चांगले काम असताना या कामात नेमका कुणी हस्तक्षेप केला?मनसेने यासाठी पाठपुरावा केला,मनसेला या कामाचे श्रेय मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक हे काम थांबविण्यात आले का?असा सवालच आता मनसेने केला आहे.श्रेया पेक्षा नागरिकांचा जीव महत्त्वाचा असून या गटारात अजून अपघात होऊ नयेत यासाठी प्रशासनाने सुरू केलेले काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी तुषार पाटील यांनी केली आहे.






