ठाणे:- हरियाणावरून नवीमुंबईकडे घोडबंदर रोड मार्गे निघालेल्या कंटेनरला सोमवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास गायमुख घाटात आग लागली. ही आग चालकाच्या केबिनला लागली असून सुदैवाने त्या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. ठाणे आणि मीरा भाईंदर महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेत त्या आगीवर नियंत्रण मिळविले. त्या कंटेनर मध्ये २० टन प्लायवूड होते अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
कंटेनर चालक मुकेशकुमार गुजर हे कंटेनर घेऊन घोडबंदर रोड मार्गे नवीमुंबईला निघाले होते. कंटेनर हा चेन्ना ब्रिज, गायमुख घाट येथे येताच अचानक कंटेनरच्या चालक केबिनमध्ये आग लागली. रस्त्यात गाडी उभी करून चालक सुरक्षित पणे बाहेर पडला. या घटनेची माहिती सुरेश देवदिगा यांनी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या दिल्यावर घटनास्थळी वाहतूक पोलीस, ठाणे आणि मीरा भाईंदर अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू झाल्यावर आग नियंत्रणात आली. यावेळी ठामपाची ०१ रेस्क्यू वाहन तर मीरा भाईंदर अग्निशमन दलाच्या ०२ गाड्या पाचारण करण्यात आल्या होत्या. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी कंटेनरचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.