Homeठाणे-मेट्रोघोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जड मालवाहतूक भिवंडी मार्गे वळवा ---...

घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जड मालवाहतूक भिवंडी मार्गे वळवा — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सुचना

सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत जड मालवाहतूकीला बंदी

ठाणे:- घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत जड मालवाहतूकीला बंदी घालण्यात यावी. सदर वाहतूक भिवंडी मार्गे वळविण्यात आल्यास या मार्गांवरून जाणाऱ्या सर्वसामान्य वाहनधारकांना थोडा दिलासा मिळेल असे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते ठाणे महापालिकेच्या सभागृहांमध्ये ठाणे शहरातील विविध विकास कामांच्या प्रगतीच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी सुमारे १८०० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून अनेक विकास कामे प्रगतीपथावर आहेत. यापैकी बहुतांश विकास कामांचे लोकार्पण १५ आक्टोबर पर्यंत करण्याचा मानस आहे. तरी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून उर्वरित कामे पूर्ण करण्यात यावीत. ३१ डिसेंबर पर्यंत घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते जोडण्यात यावेत. रस्त्याच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेचे सिमेंट अस्तरीकरण करून मुख्य रस्त्याशी जोडण्यात यावेत. असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

ठाण्यात वनराई क्षेत्र वाढविण्यासाठी चांगली संधी

या बैठकीत नांगला बंदर खाडी किनारा विकसित करताना त्या जमिनीवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करून वनराई क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी यावेळी दिल्या आहेत. त्यामुळे ठाण्यातील वनराई क्षेत्र वाढविण्यासाठी मदत होईल असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

श्वान पुनर्वसन केंद्र उभारा

ठाणे शहरात अनेक सोसायटी मध्ये भटक्या श्वानांचा सर्व सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. त्या श्वानांचा बंदोबस्त करावा. अशा अनेक तक्रारी नागरिकांकडून येतं आहेत. अशा परिस्थितीत शहरातील भटक्या श्वानांचे शहराच्या बाहेर पुनर्वसन करण्यात यावे अशी सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.

पॉड टॅक्सी चे सादरीकरण

ठाणे शहरातील मेट्रो स्थानकांना पुरक ठरेल अशी पर्यावरण पूरक, स्वस्त आणि शास्वत भविष्यकालीन वाहतूक व्यवस्था म्हणून पॉड टॅक्सी (उन्नत कार) प्रकल्पाचे लवकरच भूमीपुजन करण्याचा मानस मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. त्यापुर्वी सदर प्रकल्पाची प्रवासी वाहतूकीच्या सुरक्षिततेची कायदेशीर मान्यता, आर्थिक व्यवहार्यता तपासून हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. सुमारे ५२ किमी लांबीचा मार्ग असलेल्या पॉड टॅक्सी प्रकल्पात अंदाजे ६३ स्थानक असतील. तसेच पॉड टॅक्सी चा दर हा किफायतशीर असुन ३० रुपये प्रति माणसी प्रति टप्पा असणारं आहे.

तिसरे नाट्यगृह घोडबंदर परिसरात

ठाणे शहरातील गडकरी रंगायतन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात नंतर तिसरे नाट्यगृह घोडबंदर परिसरात बांधण्यात येईल, लवकरच याचे भुमिपुजन उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते लवकरच करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.

दरम्यान बैठकीत मोघरपाडा येथील कांदळवन उद्यान, कासारवडवली येथील तलावाचे सुशोभीकरण, जुन्या उद्यांनाचे नवीनीकरण, शहरातील विहीरीचे शास्त्रोक्त पद्धतीने पुनरुज्जीवन करणे, लता मंगेशकर संगीत विद्यालय, शहरातील चौकांचे सुशोभीकरण अशा विविध विकास कामांच्या प्रगतीचा आढावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी घेतला.

error: Content is protected !!