महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी दिले निर्देश
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कमीत कमी वेळेत उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी यांनी दिले.
निवासी डॉक्टरांच्या संख्या वाढविणे, संगणकीकृत व्यवस्था मार्गी लावणे याबाबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सूचना दिल्या. बुधवारी अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.भीमराव जाधव, डॉ. स्वप्नाली कदम, डॉ. सूचितकुमार कामखेडकर, डॉ. शैलैश्वर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठया प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. त्या सर्व रुग्णांना तपासणी, चाचण्या करण्यासाठी विविध विभागांना जावे लागते.अशा वेळी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना रुग्णांची प्राथमिक तसेच आजाराबाबतची माहिती, जुने रिपोर्ट आदींची माहिती अवगत असल्यास उपचार करण्यास सोयीचे जाते. याकरिता प्रभावी पद्धत अंमलात आणून रुग्णाचा वेळ वाचण्यासाठी विभागाने आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीद्वारे संपूर्ण रुग्णांची माहिती संगणकीकृत करण्याचे निर्देश देण्यात आले.
त्याचबरोबर राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकनानुसार निवासी डॉक्टरांच्या संख्या वाढविणे, निवासी डॉक्टरांच्या पदोन्नती करणे, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, नर्सिंग स्टाफ व टेक्निशियन आदींच्या पदोन्नती करण्यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्यास अतिरिक्त आयुक्तांनी संबधितांना सूचना केल्या.
…………….
सिल्वरलेक खुली बुद्धिबळ स्पर्धा; ठाण्याच्या नुबैरशाहने जिंकली
ठाणे : ठाण्याचा इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू नुबैरशाह शेखने आपल्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा खोचताना सर्बियात झालेल्या सिल्वरलेक खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत अपराजित वाटचाल करत नुबैरशाहने नऊ फेऱ्यामध्ये सात गुणांची कमाई करत सन्मानचिन्ह, सुवर्णपदकासह सुमारे एक लाख दहा हजार सर्बियन डॉलर्स (भारतीय चलनात ७७, ६०५ रुपये) रकमेचे बक्षीस आपल्या खिशात टाकले.
म्युन्सिपालटी वेलीको ग्रॅडिस्ट, चेस फेडरेशन ऑफ सेंट्रल सर्बिया आणि दानुबिया हॉटेल आयोजित स्पर्धेच्या शेवटच्या, नवव्या फेरीत नुबैरशाहने हंगेरीच्या क्रस्तुलोव्हीच ऍलेक्सचा पराभव करत आपले विजेतेपद निश्चित केले . चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात नुबैरशाहने ७० चालींच्या खेळानंतर हा विजय नोंदवला. सामन्यात नुबैरशाहची अडखळत सुरुवात झाली. पण डावाच्या मध्यात नुबैरशाहने क्रस्तूलोव्हीचला वारंवार चुका करायला भाग पाडून सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले. स्पर्धेत सर्वाधिक विजय नोंदवण्याऱ्या नुबैरशाहने तैपैईचा इंटरनॅशनल मास्टर सॉंग रेमंड, लुथनियाचा ग्रँडमास्टर स्ट्रेमविसीमुस टिटास, सर्बियाचे ग्रँडमास्टर दलिजानोव्हीच ब्रांको आणि स्त्रिकोव्हीच अलेक्स यांना बरोबरीत रोखले होते. स्थापत्यशास्त्रातील पदवीधर असलेल्या नुबैरशाहने या स्पर्धेतून +१५ गुणांची कमाई करत ग्रँडमास्टर किताबाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.