Homeठाणे-मेट्रोजरीमरी पोलिस वसाहतीतील जुन्या चाळींच्या जागी उभारणार टॉवर..

जरीमरी पोलिस वसाहतीतील जुन्या चाळींच्या जागी उभारणार टॉवर..

नूतनीकरण केलेल्या इमारतीचे आमदार संजय केळकर यांच्या हस्ते लोकार्पण..

ठाणे:- जरीमरी पोलिस वसाहतीमधील ए इमारतीचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले. त्याचे लोकार्पण आमदार संजय केळकर यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. चकाचक आणि सुविधायुक्त घरे ताब्यात मिळाल्याने पोलिस कुटुंबांच्या चेहेऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. दरम्यान येथील जुन्या चाळींच्या जागी येत्या काळात दोन टॉवर उभे राहणार असून तत्पूर्वी या चाळींची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

आमदार संजय केळकर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने जरीमरी पोलिस वसाहतीमधील १२ इमारती आणि नवीन पोलिस वसाहतीमधील इमारतींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी मंजूर झाल्याने इमारतींच्या सुरुवातीच्या कामाने वेग घेतला होता. पहिल्या टप्प्यात जरीमरी पोलिस वसाहतीमधील ए इमारतीचे नूतनीकरण झाले असून त्याचे लोकार्पण येथील लोकांनी आ. केळकर यांच्या हस्ते केले. यावेळी माजी नगरसेवक संतोष साळवी, निलेश कोळी, विशाल वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता वानखेडे, कनिष्ठ अभियंता प्रसाद सनगर आणि पोलिस कुटुंबे उपस्थित होती.

येथील चाळी सुमारे १०० ते १२० वर्षे जुन्या असून येत्या काळात २६ मजल्यांचे दोन टॉवर उभारण्याचे प्रयोजन आहे. तत्पूर्वी या चाळींमध्ये पोलिस कुटुंबांच्या तक्रारीनुसार आवश्यक दुरुस्ती तातडीने सुरू करण्याच्या सूचना केळकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

याबाबत बोलताना केळकर म्हणाले, दुरुस्तीसाठी ६० कोटी मंजूर करण्यात आले असून टॉवर दुरुस्तीसाठी या पूर्वीच साडेसात कोटी मंजूर झाले आहेत. आता नूतनीकरण झालेल्या इमारतीमध्ये कुटुंबांना दोन बेडरूम, हॉल व किचन मिळणार आहे. लवकरच इतर इमारतींची दुरुस्ती देखील होणार आहे. पोलिस हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावत असतात. अशावेळी त्यांच्या कुटुंबांना सुविधायुक्त आणि उत्तम दर्जाची घरे राहायला मिळावीत यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो आणि यापुढेही या कुटुंबांच्या पाठीशी राहीन, असे केळकर म्हणाले.

error: Content is protected !!