ठाणे:- महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसवाहिनी फुटली आणि गॅस गळती होण्यास सुरुवात झाल्याची घटना मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घोडबंदर रोडवरील वाघबीळ नाका येथे समोर आली. या घटनेचा फटका त्या वाहिनीवरील ५० ग्राहकांना दुपारी २ वाजेपर्यंत बसला.
वाघबीळ नाका येथे जेसीबीचा धक्का लागून गॅसवाहिनीला गळती सुरू झाल्याची माहिती सागर घोलप यांनी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महानगर गॅस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. तसेच त्या गॅस वाहिनीचा मुख्य वॉल्व बंद केल्यानंतर दुरुस्तीचे काम महानगर गॅस कर्मचाऱ्यांनी हाती घेतले. याचदरम्यान गॅस वाहिनीवरील वाघबीळ नाका परिसरातील सुमारे-५० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत झाला होता. त्या गॅसवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी २ वाजल्यानंतर त्या ग्राहकांचा गॅस पुरवठा पूर्ववत झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.