ठाणे: – घोडबंदर रोडने ठाण्याकडे येणाऱ्या वाहिनीवरील मानपाडा उड्डाणपुलाजवळील दुभाजकाला ट्रक जाऊन धडकला. या अपघातात ट्रक मधील ऑईल रस्त्यावर पसरल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. जवळपास पाच तासांनी अपघातग्रस्त ट्रक तेथून हलविण्यात आला. तर या अपघातानंतर ट्रक चालकाने तेथून पळून गेला.
ठाण्याकडे येणाऱ्या वाहिनीवरील मानपाडा उड्डाणपुलाच्या दुभाजकाला ट्रक धडकून रस्त्यावर ऑईल पसरले आहे. अशी माहिती वाहतूक पोलीस काकडे यांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. वाहतुकी पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी ट्रक मध्ये कोणी नव्हते. तसेच ही घटना शनिवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली होती. तसेच चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा असा कयास वाहतूक पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे. तर अपघातग्रस्त वाहन शहर वाहतूक विभागाचे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये २ क्रेनच्या साह्याने रोडच्या एका बाजूला करण्यात आले. तोपर्यंत सकाळचे १० वाजले होते. त्यानंतर रस्त्यावर पसरलेल्या ऑईलवर आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांनी माती पसरविण्यात आल्यावर घोडबंदर रोड वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला. अशी माहिती ठामपा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.