Homeठाणे-मेट्रोठाणे पालिकेच्या प्रभाग रचनेत नगरसेवक संख्या चोरी

ठाणे पालिकेच्या प्रभाग रचनेत नगरसेवक संख्या चोरी

डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचा प्रभाग रचनेवर जोरदार आक्षेप
प्रभाग रचनेत दलित अन् मागासवर्गीयांवर सर्वाधिक अन्याय अनेक प्रभागांचे सिमांकन चुकीच्या पद्धतीने
प्रभाग रचना ठाणेकरांच्या सुविधेसाठी नव्हे तर राजकीय पक्षाच्या लाभासाठी
आक्षेपांना उत्तरे देताना प्रशासनाची तारांबळ
प्रभाग रचना न बदलल्यास न्यायालयीन मार्ग निवडणार

ठाणे :- नागरिकांना नागरी सुविधा पुरवताना तसेच विकास कामे करताना अडथळे येऊ नयेत, यासाठी व्यवहार्य पद्धतीने प्रभागांची रचना करावी, अशी अपेक्षा बाळगली जाते. मात्र, प्रगणक गटाची माहिती नाकारून ठामपाने प्रभाग रचना केली आहे, असा आरोप करीत सबंध ठाणे शहराची प्रभाग रचना विशिष्ट राजकीय पक्षाला फायदेशीर केली आहे. त्यामुळे ही रचना बदलावी; तसेच, प्रभाग रचनेबाबत फेरसुनावणी घ्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने आ. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली. दरम्यान, प्रभाग रचनेतील अनियमिततेबाबत डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. प्रगणक गट, लोकसंख्येची गणितीय आकडेवारी, लोकसंख्येची घनता, क्षेत्रफळ आदी मुद्यांवर उत्तरे देताना प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.

ठाणे महानगर पालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. नागरिकांनी नोंदविलेल्या 269 हरकतींवर आज सुनावणी घेण्यात आली. मूळ सुनावणीला सुरूवात होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड , शिवसेना नेते मा. खा. राजन विचारे , काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई , शिवसेनेचे केदार दिघे आदींनी सबंध प्रभाग रचनाच चुकीच्या पद्धतीने केली आहे, ही बाब उपमुख्य सचिव संजय सेठी यांच्या निदर्शनास आणून दिली.

या प्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक २०२५ ची प्रभाग रचना करावयाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाकडे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक न्याय निवाड्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि भयमुक्त असणे आवश्यक आहे. मात्र, ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये हेच तत्त्व डावलण्यांत आले आहे. प्रभाग रचना सन २०११ च्या जनगणनेच्या आधारावर केली जात आहे असे जाहीर करण्यांत आले आहे. प्रभाग रचनेचा जो मसुदा प्रसिध्द करण्यांत आला, त्यामध्ये प्रभागाची लोकसंख्या दर्शविण्यात आली. मात्र, मसुद्यामध्ये प्रगणक गट यांचे नकाशे आणि प्रती प्रगणक गट लोकसंख्या, त्यातील अनुसुचित जाती व जमातींची लोकसंख्या ही मुलभूत माहिती प्रसिध्द करण्यांत आली नाही. यामुळे महापालिकेने प्रसिध्द केलेल्या मसुद्यांमधील लोकसंख्येचा कोणताही पडताळा घेता आला नाही. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचाराणा करुनही सदर माहिती प्राप्त झाली नाही. नागरिकांना योग्य व पुरेसे प्रतिनिधीत्व मिळावे याकरिता निवडणुका घेतल्या जातात, त्यासाठी पूर्ण शहरातील लोकसंख्या लक्षात घेऊन एकूण नगरसेवक पद संख्या निर्धारीत केली जाते. एकूण नगरसेवक पद संख्येनुसार प्रती नगरसेवक लोकसंख्या ठरविली जाते. सामान्यतः चार नगरसेवकांचा एक प्रभाग व आवश्यकता भासल्यास तीन किंवा पाच नगरसेवकांचा एक प्रभाग अशी प्रभाग रचना करणे अपेक्षित आहे. प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या ठरविताना सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के जास्त किंवा १० टक्के कमी लोकसंख्या कमी – जास्त करता येते. ठाणे महानगरपालिकेची ४ सदस्य प्रभाग सरासरी लोकसंख्या ५६,२२८ आणि प्रती तीन सदस्य सरासरी लोकसंख्या ४२,१७१ इतकी आहे. १०% जास्त व १०% कमी असा एकूण २०% लोकसंख्या फरकाचा गैर फायदा घेऊन ठाणे शहर क्षेत्र व दिवा क्षेत्र येथे कमी लोकसंख्येचे प्रभाग बनविण्यांत आले आणि कळवा मुंब्रा क्षेत्रात जास्त लोकसंख्येचे कमी प्रभाग बनविण्यांत आले आहे. या प्रकारे कळवा, मुंब्रा क्षेत्रात ०४ सदस्यांचा पूर्ण एक प्रभाग चोरण्यात आला आहे, असा आक्षेप नोंदविला.
डाॅ. आव्हाड पुढे म्णाले की, सामान्यतः ठाणे महानगरपालिकेचे ठाणे शहर, कळवा, मुंब्रा आणि दिवा असे तीन भौगोलिक व राजकीय भाग आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार ठाणे शहर क्षेत्राची लोकसंख्या ११,६०,४१९, कळवा व मुंब्रा क्षेत्राची लोकसंख्या ४,७५,५२२ आणि दिवा क्षेत्राची लोकसंख्या २,०५,५४७ अशी आहे. त्याचा आधार घेऊन ठाणे शहर क्षेत्रामध्ये एकूण २१ प्रभाग प्रस्तावित केले आहेत आणि एकूण नगरसेवक संख्या ८४ इतकी आहे. कळवा, मुंब्रा क्षेत्रामध्ये एकूण ०८ प्रभाग प्रस्तावित आहेत आणि एकूण नगरसेवक संख्या ३२ इतकी आहे. दिवा क्षेत्रामध्ये एकूण ४ प्रभाग प्रस्तावित आहेत आणि एकूण नगरसेवक संख्या १५ इतकी आहे. याचा अर्थ की, कळवा, मुंब्रा क्षेत्रामध्ये एकूण ३४ इतकी नगरसेवक संख्या असणे अपेक्षित आहे, मात्र ३२ नगरसेवक प्रस्तावित केले आहे. ठाणे शहर क्षेत्रामध्ये ८२ इतकी नगरसेवक संख्या अपेक्षित आहे. मात्र ८४ नगरसेवक प्रस्तावित केले आहे. दिवा क्षेत्रामध्ये २,०५,५४७ /१४०५७ आ लोकसंख्येचे १३ इतकी नगरसेवक संख्या अपेक्षित आहे, मात्र एकूण नगरसेवक संख्या १५ इतकी प्रस्तावित आहे. कळवा, मुंब्रा क्षेत्रामध्ये आता पर्यंत झालेल्या निवडणूकामधून या भागातून नेहमी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मत झालेले आहे. त्यामुळे येथील नगरसेवक संख्या कमी करण्यात आली आहे, म्हणूनच ठाणे शहराची प्रगणक गटाची पूर्ण माहिती मिळाल्यावर आम्ही चर्चेस सहभागी होऊ, असे सांगितले.
दरम्यान, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले झाले आहे. तरीही, आम्ही विनंती करतो की, या प्रभाग रचनेत नियमानुसार बदल करावेत; अन्यथा, आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी दिला.

प्रभाग रचनेत आदिवासी, दलित अन् मागासवर्गीयांवर सर्वाधिक अन्याय

ही प्रभाग रचना करताना सर्वाधिक अन्याय हा आदिवासी, दलित- मागासवर्गीय आणि स्थानिक भूमिपुत्रांवर करण्यात आला आहे. दलितबहुल वस्त्यांची विभागणी करून त्यांची लोकसंख्या कमी दाखविण्यात आले आहे. त्यामुळे दलितांना मिळणारे ठाणे पालिकेतील प्रतिनिधीत्व कमी होणार आहे. त्याचे मोठे उदाहरण आनंद नगर (ठाणे पूर्व) हे आहे. तसेच, भूमिपुत्रांची वसाहत असलेले कोळीवाडेही एकत्रित न ठेवता ते विभागण्यात आले आहेत. परिणामी स्थानिक भूमिपुत्रांना एकत्र न ठेवता त्यांच्यातही फूट पाडण्यात आली आहे, असा आक्षेप डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी नोंदविला.

error: Content is protected !!