ठाणे:- पुण्याच्या थेउर येथे ५ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या महिला शरीरसौष्ठव स्पर्धेत ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस अंमलदार रेखा बाबुराव शिंदे यांनी ‘महाराष्ट्र श्री’ हा महत्वाचा मानला जाणारा किताब पटकावुन ठाणे पोलीसांच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. या कामगिरीनंतर ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शिंदे त्यांचा सत्कार करून विशेष आभार मानुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा मुंबई, ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डींग असोसिअशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. दरम्यान अंत्यत चुरशीच्या झालेल्या त्या स्पर्धेत मुंब्रा पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार असलेल्या रेखा शिंदे यांनी आपले नाणे खणखणीत असल्याचे दाखवून दिले. तसेच शिंदे यांनी यापूर्वीही महाराष्ट्र पोलीस गेम २०२३ मध्ये पुणे येथे झालेल्या स्पर्धेत ५०-५५ वजनी गटामध्ये सुवर्णपदक व चॅम्पियनशिप मिळविली होती. याशिवाय २०२३ मध्ये हरियाणा येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये देखील सुवर्णपदक व चषक मिळविले होते. त्याचबरोबर २०२४ मध्ये लखनऊ येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस गेम रेसलिंग क्लस्टर या स्पर्धेत रौप्य पदक मिळवले होते. तर महाराष्ट्र पोलीस गेम-२०२४ नाशिक येथे झालेल्या स्पर्धेत देखील त्यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले होते.