ठाणे:- ठाणे महानगरपालिकेच्या रणधुमाळीसाठी आता महायुतीमध्ये खऱ्या अर्थाने हालचाली सुरू झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपला स्थान?
दिवा हा पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा अभेद्य गड मानला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत या भागात भारतीय जनता पक्षानेही आपले संघटन मोठ्या प्रमाणावर मजबूत केले आहे. येथील वाढता मतदार वर्ग आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा वाढता प्रभाव पाहता, महायुतीत दिव्यातील जागांसाठी चुरस निर्माण झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या जागावाटपात दिव्यात भाजपला किमान दोन जागा सोडण्यावर प्राथमिक सहमती झाल्याची चर्चा आहे. जर असे झाले, तर हा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा मोठा शिरकाव मानला जाईल.
दिव्यात शिवसेनेचे प्राबल्य असले तरी, मित्रपक्षाला सोबत घेऊन जाण्याच्या रणनीतीनुसार भाजपला येथे दोन जागा सोडल्या जाऊ शकतात.
स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक:
दिवा परिसरात शिवसेनेचे अनेक जुने आणि निष्ठावान इच्छुक उमेदवार आहेत. दुसरीकडे, भाजपनेही या भागात गेल्या काही काळापासून मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे दोन जागा भाजपला सुटण्याची चर्चा आहे.






