ठाणे:- “स्वतःच्या पायावर उभे राहिल्याशिवाय या जगात निभाव लागणं कठीण आहे,” असं म्हटलं जातं. मात्र, मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंजणाऱ्या व्यक्तींनी स्वतःला सक्षम करण्यासाठी काय करावं, हा मोठा प्रश्न असतो. यावर ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने समर्पक उत्तर शोधत मनोरुग्ण महिलांसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे. रोटरी क्लब ऑफ मुंबई कलाकार आणि नॅक फाउंडेशन यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या उपक्रमातून आतापर्यंत ३० महिला रुग्णांनी प्रशिक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत मजल मारली आहे.
मनोरुग्णांवरील उपचारांबरोबरच त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्यांचा विकास करणे हे ठाणे मनोरुग्णालयाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार विभाग हा उपक्रम राबवत आहे.ऑगस्ट २०२४ पासून सुरू असलेला चार-स्तरीय ब्युटीशियन कोर्स प्रत्येकी दोन महिन्यांच्या कालावधीचा असून, प्रत्येक स्तरात १० महिला रुग्णांना प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत तिसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. या प्रशिक्षणात बेसिक ब्युटी सर्व्हिसेस, फेशियल, मेकअप आणि हेअर स्टाइल यांसारख्या कौशल्यांचा समावेश आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात येते.
मनोरुग्ण महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षणासोबतच हस्तकला, सण-उत्सवासाठी लागणाऱ्या वस्तू तयार करणे आणि इतर व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षणही दिले जाते. यामुळे, उपचार घेत असतानाच त्या स्वावलंबी होण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉ. हेमांगिनी देशपांडे, डॉ. जानवी केरझरकर, डॉ. आश्लेषा कोळी, डॉ. प्राजक्ता मोरे आदी तज्ञ अथक परिश्रम घेत आहेत
” मनोरुग्ण महिलांनी उपचारानंतर समाजात आत्मनिर्भरपणे वागावे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. या प्रशिक्षणामुळे मनोरुग्ण महिलांना आत्मविश्वास मिळत असून, त्यांचे भविष्यातील जीवन अधिक सुरक्षित आणि स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल. “- डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक, ठाणे मनोरुग्णालय.