Homeठाणे-मेट्रोठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर

ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर

दि. ०४ सप्टेंबर, २०२५ पर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येणार

संपूर्ण प्रारूप आराखडा वेबसाईटवर उपलब्ध

महापालिका मुख्यालय आणि प्रभाग समिती कार्यालय येथेही पाहता येणार प्रारूप आराखडा

ठाणे :- महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला आहे. हा आराखडा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यावरील हरकती आणि सूचना ०४ सप्टेंबर, २०२५ पर्यंत नोंदवता येतील, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९च्या कलम ५ (३) च्या तरतुदीखाली ठाणे महानगरपालिकेच्या बाबतीत निवडावयाच्या सदस्यांची संख्या व प्रभागांची संख्या पुढीलप्रमाणे निश्चित केली आहे. ठाणे महानगरपालिकेत एकूण सदस्यांची संख्या १३१ आहे. एकूण प्रभागांची संख्या ३३ आहे. त्यापैकी, चार सदस्यीय प्रभागांची संख्या ३२ असून तीन सदस्यीय प्रभागांची संख्या १ आहे.

प्रारुप अधिसूचनेद्वारे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रभागांची संख्या व त्यांची व्याप्ती निश्चित करण्यात आली आहे. तसेच, ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी हा प्रारूप आराखडा वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला आहे. तसेच, महापालिका मुख्यालय येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह, पहिला मजला, पाचपाखाडी, ठाणे येथे हा प्रारूप आराखडा प्रदर्शित करण्यात आला आहे. तसेच, प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयात हा प्रारूप आराखडा सर्व नागरिकांसाठी सोमवार ते शुक्रवार या दिवसात कार्यालयीन वेळेत खुला रहाणार आहे.

या अधिसूचनेच्या अनुषंगाने नागरिकांच्या हरकती किंवा सूचना असल्यास त्यांनी त्या आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांच्यासाठी मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र किंवा प्रभाग समिती कार्यालय येथे दिनांक ०४.०९.२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहेत.

error: Content is protected !!