ठाणे:- शहरातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या टॉपर विद्यार्थ्यांना आमदार संजय केळकर यांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रेरणा व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण संस्था आयोजित ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील ठाणे शहरातील 10 वी आणि 12 वी मधील “मी होणार ठाण्याचा टॉपर” या स्पर्धेतील टॉपर विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा 30 जुलै रोजी गडकरी रंगायतन येथे पार पडला.
टॉपर विद्यार्थ्यांना रोख रक्कम, ट्रॉफी, व सन्मानचिन्ह देऊन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 10 वी परिक्षेत प्रथम क्रमांक गौतमी सहस्त्रबुद्धे (१००टक्के), द्वितीय क्रमांक ओम पणशीकर (९८ टक्के), तृतीय क्रमांक गिरीशा जाधव (९७.८० टक्के) तसेच 12 वी परिक्षेत प्रथम क्रमांक ( सायन्स) सानिका गोरे (९५.३३टक्के) द्वितीय क्रमांक (सायन्स) सृष्टी खाडे (९४.६७ टक्के) आणि तृतीय क्रमांक (कॉमर्स ) दीपेशकुमार राव (९४ टक्के) यांच्यासह 20 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
गुणवंत विद्यार्थी घडवणाऱ्या आनंदीबाई केशव जोशी, डॉ. बेडेकर विद्यामंदिर, मावळी मंडळ, सरस्वती सेकंडरी स्कुल, पोलीस स्कुल, एम.एच हायस्कुल, बांदोडकर कॉलेज, जोशी-बेडेकर कॉलेज, ज्ञानसाधना कॉलेज आदी शाळा-कॉलेजचा सुध्दा सर्वोत्कृष्ट सन्मानचिन्ह ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शाळा, कॉलेजचे शिक्षक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वर्षी जे विद्यार्थी 10 वी आणि 12 वी मध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी तयारी बोर्ड परीक्षेची हा प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित केला होता. ठाणे शहरातील विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर आमदार संजय केळकर, ज्येष्ठ नगरसेवक भरत, परिवहन सदस्य विकास पाटील, टॉपर स्पर्धेचे कार्यवाहक, ठाणे शहर भाजपा चिटणीस संतोष साळुंखे कोचिंग क्लास संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष सतीश देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, स्वप्नाली साळवी, माधुरी मेटांगे, निलेश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
अनिल काकुळते यांनी सूत्रसंचालन केले. मी होणार ठाण्याचा टॉपर या स्पर्धेचे हे पहिले वर्ष आहे, अशी माहिती प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष श्री. पंढरीनाथ पवार यांनी दिली.






